BULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

बारावी पेपरफुटीप्रकरणात वादग्रस्त ठरलेले राजेगावचे परीक्षा केंद्र ठरले का पैसे कमविण्याचे साधन?

UPDATE : 

सदर प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही – किशोर पागोरे, तत्कालिन शिक्षणाधिकारी

सदर शाळेची नोकरभरती आणि इतर मुद्दे या अनुषंगाने चौकशीसाठी माझ्याकडे शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी दिले होते. सदर बाबतीत मी तीन सुनावण्या घेतल्या आहेत. परंतु, शाळेच्या मुख्याध्यापकाने कागदपत्रे सादर केले नाहीत. त्यामुळे अंतिम तारीख दिली होती. व त्यानंतर १० फेब्रुवारी २०२३ला मला कार्यमुक्त करण्यात आले, त्यामुळे सदर चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. तसा अहवाल मी शिक्षण उपसंचालक अमरावती यांना दिलेला आहे. सदर प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.

– किशोर पागोरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी, बुलढाणा/ विद्यमान शिक्षणाधिकारी यवतमाळ


– मेहकर येथील गजानन खंडारे यांची साखरखेर्डा पोलिसांत लेखी तक्रार दाखल

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – बारावी गणिताचा पेपर फुटीप्रकरणी राज्यात चर्चेत आलेले राजेगाव (ता. सिंदखेडराजा) येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व त्यांच्या संस्था चालकांसह प्राचार्य विकास सरकटे, संस्थाध्यक्ष सूर्यकांत पवार व तत्कालिन शिक्षणाधिकारी  यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाची तक्रार मेहकर येथील गजानन संपतराव खंडारे यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारअर्जात गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले असून, पेपरफुटीप्रकरणी नियुक्त केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) हा तक्रारअर्ज रेकॉर्डला घेऊन त्याचा तपास करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजेगाव येथील हे वादग्रस्त परीक्षा केंद्र शिक्षण खात्यातीलच कुणाच्या वरदहस्ताने व पैसे कमविण्यासाठी चालविले जात होते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

आधीच पेपर फुटी प्रकरण गाजत असताना, आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यासाठीची तक्रार अमरावती मंडळाला करूनही दोघाजणांनी शासनाला चुकीची माहिती पुरवून आणि तिसर्‍याने त्याला पाठबळ देऊन सदर परीक्षा केंद्र केवळ पैसे कमावण्यासाठी मिळवल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. प्राचार्य विकास नामदेव सरकटे, (तोतया अध्यक्ष, सचिव) व सूर्यकांत हिम्मतराव पवार यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली.

गजानन खंडारे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते म्हणतात की, सरकटे आणि पवार यांनी कनिष्ठ महाविद्यालय मान्यता वर्धित विनियम ६६/९ नुसार चुकीची माहिती पुरविलेली आहे. वास्तविक पाहता, सदर संस्थेच्या पीटीआरनुसार संस्था अध्यक्ष व सचिव गैरअर्जदार हिम्मत पवार नसतांनासुद्धा स्वतः अध्यक्ष, सचिव नात्याने संगनमत करून उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रासाठी बनावट अभिलेखे सादर करून परीक्षा केंद्र मिळविले आहे. पवार यांनी पुरविलेली बनावट यादीदेखील वरिष्ठांना पाठविण्यात आली. दरम्यान, तक्रारीनुसार विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती यांचा ३० नोव्हेंबर २०२२ रोजीचा तपासणी अहवाल जोडलेला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रासाठी लागणार्‍या भौतिक सोयीसुविधा, रेकॉर्ड व कर्मचारी वर्ग शासकीय नियमानुसार उपलब्ध नाही, असे म्हटले आहे. शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्या ८ डिसेंबर २०२२ च्या पत्रानुसार, सदर शाळेच्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करण्यासाठी किशोर पागोरे यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केले व सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल १५ दिवसांच्याआत सादर करण्याचे निर्देश दिलेले असतांना त्यांनी हेतुपुरस्सरपणे सदर भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात विलंब केला.

१६ जानेवारी २३ रोजी तक्रारदार खंडारे व प्राचार्य सरकटे यांना सुनावणी संदर्भात पत्र पाठवून सुनावणी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कक्षात ठेवली. यावेळी प्राचार्य सरकटे सुनावणीसाठी गैरहजर होते. किशोर पागोरे यांनी पुन्हा ३० जानेवारी रोजी सुनावणी ठेवली. यावेळेससुद्धा प्राचार्य सरकटे संबंधित अभिलेखे घेवून न आल्याने पुन्हा ३ फेब्रुवारीला सुनावणी घेतली. परंतु सुनावणी घेवूनसुद्धा किशोर पागोरे यांनी हेतुपुरस्सरपणे चौकशीचा अंतिम अहवाल तयार केला नाही. त्यामुळे संशयाची पाल चुकचुकत असून, संबंधित तिघांनी संगनमत करून शासनाला खोटी माहिती देऊन फसविल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार गजानन खंडारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर लेखी तक्रारअर्ज साखरखेर्डा पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे. याप्रकरणी एसआयटी आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!