Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

मोठी बातमी! बुलढाण्यात शिंदे गटाला भलं मोठं भगदाड?

– खासदार प्रतापराव जाधव म्हणतात.. त्यांचा गैरसमज दूर करू!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहर्‍याला तालुकाप्रमुखपदी नियुक्ती देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होऊन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्यासह १७ पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र खासदार प्रतापराव जाधव यांची या वृत्तासंदर्भातील प्रतिक्रिया सहज असून, त्यांच्याकडे अद्याप कुणाचे फोन किंवा राजीनामाबाबत निवेदन आले नसल्याचे ते सांगतात. असे असले तरी जिल्ह्यातील घाटाखालील भागात शिंदे गटाला मोठा झटका बसल्याच्या चर्चेला पेव फुटले असून, भलं मोठं भगदाड संपर्कप्रमुखांच्या जिल्ह्यातच पडल्याची राजकीय चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

बुलढाणा – खामगाव तालुका शिवसेना प्रमुख बदलण्याच्या ऐकीव माहितीने तालुका शिवसेनेत प्रचंड रोष व्यक्त होत होत होता. दरम्यान, राजीनामा सत्र सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वावगे, खामगाव शहर प्रमुख रमाश (बाबू) भट्टड़सह खामगाव तालुक्यातील १७ शिवसेनेच्या निष्ठावान पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे निवेदन ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती लागले आहे. याबाबत ९ मार्चरोजी शिवसेना संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांना सामूहिक राजीनामा पत्र पाठविण्यात आल्याचेही पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र काही पदाधिकारी तळ्यात मळ्यात असून, मौन आहेत. खामगाव तालुका शिवसेना प्रमुख बदलणार असल्यामुळे या पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. पक्षात नव्यानेच इनकमिंग केलेल्या पदाधिकार्‍यांना महत्त्वाची पदे दिली जात आहे, मात्र ती व्यक्ती या पदांच्या लायकीचे नाहीत, असे राजीनामे देणार्‍या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ज्यांना नवीन नियुक्ती देत आहात ते ग्रामीण भागातील पदाधिकारी जसे विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, युवा सेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना ओळखतही नाहीत. त्यांना ग्रामीण भागातील गावांचीसुध्दा माहीती नाही. यापूर्वी त्यांनी कोणत्याही राजकीय संघटनेत काम केले नाही. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या व्यक्तीची तालुका प्रमुखपदावर नियुक्ती केली जात असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी असल्याने त्या व्यक्तिसोबत काम करू शकत नसल्याचे जुन्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या सामूहिक राजीनामापत्रावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताड़े, तालुकाप्रमुख सुरेश वावगे, शहरप्रमुख रमेश (बाबू) भट्टड़ यांच्यासह युवासेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, उपतालुका प्रमुख गजानन सातव, उपतालुका प्रमुख विष्णूदास कदम, उपतालुका प्रमुख गजानन हुरसाड, उपतालुका प्रमुख गोपाल भिल, युवासेना उपतालुका प्रमुख शैलेंद्र चव्हाण, युवासेना उपतालुका प्रमुख करण पाटेखेड़े, युवासेना उपतालुका प्रमुख गौरव देशमुख, युवासेना उपतालुका प्रमुख नयन टीकार, युवासेना उपतालुका प्रमुख विष्णू काळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नीलेश देवताळू, विद्यार्थी सेना शहरप्रमुख विक्की सारवान, विभागप्रमुख तथा सरपंच आत्माराम बगाड़े, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अक्षय सूर्यवंशी व युवासेना उपशहरप्रमुख चेतन गायकवाड आदिंच्या सह्या आहेत.

दरम्यान, खासदार जाधव प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, माझ्याकडे राजीनामे देणार्‍या पदाधिकार्‍यांचे निवेदन किंवा फोन आलेले नाहीत. त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर केल्या जाणार आहे.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!