BULDHANAHead linesVidharbha

‘अंगणवाडी ताई’ गिरवणार आता नवीन इमारतीत ‘अक्षरे’!

– एका इमारतीसाठी ११ लाख तर एकूण १२ कोटींचा होणार खर्च!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य सरकार बालकांचे आरोग्य व शिक्षणावर मोठा खर्च करते, हे वास्तव असले तरी विशेषतः ग्रामीण भागात अनेक अंगणवा़ड्या कुठे भाड्याच्या खोलीत तर कुठे उघड्यावर भरतात, हे वास्तवसुध्दा नाकारून चालणार नाही. याकड़े शासनाने आता विशेष लक्ष दिले असून, जिल्ह्यात १०६ अंगणवाड़ी केंद्रांना नवीन इमारती बांधून मिळणार आहेत. त्यामुळे अंगणवाड़ी ताई आता सुसज्ज इमारतीत अक्षरे गिरवणार असून, पोषण आहारही तेथेच शिजणार आहे. त्यामध्ये एक अंगणवाड़ी इमारत बांधकामासाठी ११ लाख याप्रमाणे १०६ अंगणवाडी इमारतींसाठी १२ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

शून्य ते सहा वयोगटातील बालकांना शरीरसदृढ व्हावे, अक्षर ओळख व्हावी, शिक्षणाची गोड़ी लागावी, यासाठी शासनाने अंगणवा़ड्या सुरू केल्या आहेत. परंतु आजही विशेषतः ग्रामीण भागात बर्‍याच अंगणवाड़ी केंद्रांना स्वतःच्या इमारती नाहीत. कुठे भाड्याच्या खोलीत तर कुठे उघ़ड्यावरसुद्धा अंगणवाड़ी भरवावी लागते. पोषण आहार वाटपही तेथेच करावा लागतो. यासाठी अंगणवाड़ी सेविका, मदतनीस मेहनत घेतात. यामध्ये काही गावात जागेची अड़चण असते तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होते. यामुळे शासनाने आता विषेश लक्ष घातले असून, बरेच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून जिल्ह्यातील १०६ अंगणवाड़ी केंद्रांसाठी इमारती मंजूर केल्या आहेत. प्रत्येक अंगणवाड़ी केंद्र इमारतीसाठी ११ लाख २५ हजार याप्रमाणे १०६ इमारतीसाठी १२ कोटीच्या आसपास खर्च होणार आहे. या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
यामध्ये बुलढाणा तालुक्यातील पाड़ळी, वरवंड़, गुम्मी, मढ, ड़ोंगरखंड़ाळा, गिरड़ा, पोखरी, साखळी बु. चांड़ोळ, पिंपळगाव सराई, सातगाव, जामठी, पांगरी, सुंदरखेड़, सव, तराड़खेड़, मोताळा तालुक्यातील जयपूर, लिहा बु. गुळभेली, रामगाव तांड़ा, धामणगाव बढे २, पोफळी, कोथळी, मोहेगाव, बोराखेड़ी पिपळगांव देवी, खैरखेड़, मेहकर तालुक्यातील वरूड़, दादुलगव्हाण, सुळा, बार्‍हई , कनका बु. गोहोगाव, उकळी, चिंचोली बोरे, लोणार तालुक्यातील पिंपळनेर, पार्ड़ा दराड़े, नांद्रा मुंढे, जांभुळ, पांग्रा ड़ोळे, देऊळगाव कुंड़पाळ २, बिबखेड़, नांदुरा तालुक्यातील निमगाव बु. फुली, नारखेड़, मलकापूर तालुक्यातील भालेगाव, कुंड़ खु. झोड़गा, देवधाबा, खामगाव तालुक्यातील गवंढाळा, विहिगाव, पळशी बु., शहापूर, घारोड़, कुबेफळ, भालेगाव, टाळकी तलाव, लांजुळ, गोंधनापूर, ढोरपगाव, काळेगाव, कदमापूर, अटाळी २, उमरा लासुरा, शेगाव तालुक्यातील पहुरजीरा, देउळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, सावखेड़ भोई, डोड्रा, सिंदखेड़राजा तालुक्यातील सोनोशी, झोटींगा, सवड़द, अंचली , जनुना तांड़ा, चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे, अंञी कोळी, माळशेंबा शेलूद, तोरणवाड़ा, मोहोदरी, इसोली, चांधई, किन्होळा, केळवद, सवणा, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, वरवट खंड़ेराव, टुनकी, काकनवाड़ा खु. चिचारी, पातुर्ड़ा बु. कवठळ, आलेवाड़ी, टाकळी पंच, वरवट बकाल, जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटापरी, गोमाल, ड़ुक्करदरी, जामोद, हेलापाणी, गोराळा, भिंगारा भेंड़वळ बु. व निमखेड़ी फाटा आदी गावातील अंगणवाड़ी केंद्रांचा समावेश आहे. सदर कामे शासनाच्या लेखाशीर्ष २२३६- ११७७ मधून करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ही कामे होणार आहेत.


अंगणवाड़ी इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकड़ून निधी मंजूर झाला असून, लवकरच कामांना सुरूवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. पुढील वर्षीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत तालुकास्तरावर संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
अरविंद रामरामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) जिल्हा परिषद बुलढाणा


दरम्यान, अंगणवाडी इमारतींची कामे मिळविण्यासाठी आतापासून ठेकेदार सरसावले असून, राजकीय नेत्यांमार्फत जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, जिल्हा परिषदेतही चकरा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग ही कामे नेमके कुणाला देते, त्यासाठी कोणत्या नेत्याचे वजन खर्ची पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!