सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यात जसे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, शहर उत्तर मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख हा जसा दादा, मामा, मालकांचा बोलबाला या तालुक्यात आहे. असाच बोलबाला सध्या आता सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढत आहे.
भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या खांद्यावर आल्यापासून त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. जिल्हाध्यक्षपद मिळण्याच्या अगोदर सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट तालुकासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विश्वास दाखवित आमदार कल्याण शेट्टी यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे यांच्याकडे जरी जिल्ह्याचे पालकत्व असले तरी कोणत्या तालुक्याला किती निधी द्यायचा, आणि किती नाही, याची संपूर्ण जबाबदारी सध्या आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतची प्रचिती जिल्हा परिषदेमधील जनसुविधा असो की नागरी सुविधा असो, किंवा दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी असो, या सर्व विविध विकासनिधी कशा पद्धतीने वाटप करायचे याबाबतची सर्व यंत्रणा कल्याणशेट्टी यांच्या हातात घेतली आहे.
विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी आजपर्यंत आमदारापर्यंत जाणे पसंत केले नव्हते. त्यांनाही आता आमदारापर्यंत जावे लागत आहे. एकवेळ अशी होती जिल्हा परिषदेमध्ये निधी वाटप केला जात होता. त्यामध्ये सर्वाधिक निधी हा माढा, करमाळा, पंढरपूर, बार्शी येथील नेते घेऊन जात होते. परंतु सध्या येथील लोकप्रतिनिधी यांनादेखील आता आमदार कल्याणशेट्टी मागे टाकत अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना निधी वाटप मोठ्या प्रमाणात दिला जात आहे. त्यामुळे येथील मतदार दादामुळेच गावाला निधी मिळाला असल्याचा गवगवा करीत आहेत.
विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मात्र नाराज!
आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी जिल्हा परिषदेच्या निधी वाटपामध्ये लक्ष दिले नव्हते. परंतु सध्या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्याने कोणताही निधी द्यायचा असेल तर आमदाराच्या शिफारशी शिवाय द्यायच्या नाहीत, अशी तंबी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भरलेली असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उठत आहे.