चिखली (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघातील सवणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सात विद्यार्थ्यांची राज्याबाहेर अभ्यास भेट या शैक्षणिक उपक्रमांतर्गत झालेली निवड ही अभिमानाची बाब असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करताना भविष्यातील शैक्षणिक उपक्रमासाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केला.
राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत ‘राज्याबाहेर अभ्यासभेट’ या शैक्षणिक उपक्रमात चिखली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सवणा येथील सात विद्यार्थ्यांची निवड झालेली असून हे विद्यार्थी दिल्ली येथे अभ्यास भेट देणार आहेत. या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड या दौर्यासाठी करण्यात आली असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते सत्कार करून त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सवणा जिल्हा परिषद शाळा येथे हा सत्कार पार पडला.
या दौर्यामध्ये धनराज संजय जोशी, वर्ग सातवा, आदित्य ज्ञानेश्वर भुतेकर, वर्ग सातवा , श्रीकेश देशमुख, वर्ग आठवा प्रतीक सुरडकर, वर्ग आठवा, कु. सुहानी राजू साळोक, वर्ग सातवा, कु. धनश्री शिवनाथ भुसारी, वर्ग सातवा, कु. गायत्री समाधान बाजड, वर्ग सातवा. यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी विमानाने प्रवास करणार असून दिल्ली येथे १० मार्च ते १६ मार्च दरम्यान संसद भवन, दिल्ली, राजघाट, वृंदावन, मथुरा, आग्रा, फत्तेपूर येथे अभ्यास भेट देणार आहेत. संपूर्ण चिखली तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, केंद्र प्रमुख आणि अधिकारी वर्ग या सर्वांचे खूप खूप अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सचिव पंजाबराव धनवे, गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाखळे, गट शिक्षणाधिकारी खेडेकर, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
खर्च आणि पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दिली दहा हजाराची भेट!
निवड झालेले सर्व खेळाडू विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील आहे. त्यांच्या जाण्या-येण्याचा खर्चसुद्धा लोक वर्गणीतून करण्यात येत आहे. कोणी बॅग दिली, शूज दिले, अनेक जणांच्या मदतीमधून सदर विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा नियोजित करण्यात आलेला आहे. आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्यावतीनेसुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौरा दरम्यान विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी दहा हजार रुपयाची भेट त्यांना यावेळी देण्यात आली. त्यावेळी बोलताना आपल्या राज्याबाहेरील विविध संस्कृती, माणसे व त्यांचे जगणे, तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून ही अभ्यासभेट नक्कीच उपयुक्त ठरेल. असा आशावाद ही आ. सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.