BULDHANAChikhaliMEHAKARVidharbhaWomen's World

खामगाव ते जालना राष्ट्रीय महामार्गावर प्रसाधनगृहाविना महिला प्रवाशांची कुंचबणा!

चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – खामगाव ते जालना नॅशनल हायवे रोडच्या चौपदरी सिमेंट करणाचे काम पूर्ण झाले असून, मुख्य रस्त्यावरील ठिकठिकाणी चौफुलीवर प्रवासी निवारे बाधले आहेत. मात्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे महिला प्रवाशांना लघुशंकेसाठी फार मोठी कुचंबणा सहन करावी लागत आहे. त्यामुळे प्रवासीवर्गातून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांबद्दल तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा नॅशनल हायवे असलेला एकमेव खामगांव ते जालना हायवे आहे. या नॅशनल हायवे रोडच्या चौपदरी करणाचे काम नुकतेच दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण होवून हायवेवर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. याच हायवे रोडवर संबंधीत ठेकेदाराने ठिकठिकाणच्या फाट्यावर प्रवासी निवारे बाधले आहेत. मात्र हे प्रवासी निवारे मुख्य ठिकाणापासून दूर दूर बांधले गेलेले आहेत. या प्रवासी निवार्‍याचा वापर नागरिक वस्तू साठवणूक करण्यासाठीच करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात उघड्यावर उभे राहावे लागते. ठेकेदाराने प्रत्येक फाट्यावर प्रवासी निवार्‍याच्या जवळपास अथवा रस्त्यालगत प्रसाधन गृहाची निर्मिती करणे गरजेचे होते. परंतु, काम चालू असतेवेळी एकाही स्थानिक लोकप्रतिनिधीं अथवा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ठेकेदाराने प्रवाशांकरीता प्रसाधनगृह किंवा मुत्रीघराची व्यवस्था केली नसल्याने प्रवाशांना बाहेर उघड्यावर शौचाल्यास तसेच लघुशंकेकरीता एखाद्या झाडाच्या, किंवा दुकानाच्या आडोशाला जावून लघुशंका करावी लागत आहे. त्यामध्यें महिला वर्ग, तरुण मुलींना तर लघुशंकेसाठी काटेरी झुडपे अथवा लहान मोठ्या दुकानाच्या भिंतीच्या आडोशाचा आधार घ्यावा लागतो. मात्र अशावेळी बरेच पुरुष मंडळी रस्त्याने ये- जा करणार्‍यांचा कुठलाही विचार न करता रोडलगतच लघुशंका करतात. याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. प्रत्येक फाट्यावर खासगी व्यावसायीकांनी हॉटेल, दुकाने थाटले आहेत, अशा ठिकाणी तरी प्रसाधनगृह उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.


वास्तविक पाहाता, नियमाप्रमाणे महामार्गावरील बसथांबे अथवा प्रवासी निवाराजवळ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. तसेच, हे स्वच्छता गृहे आहेत की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांची आहे. परंतु, हे दोघेही या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत असल्याने महिलावर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रश्नी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी महिलावर्ग करत आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!