हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाले; हतबल शेतकर्याने तोंड झोडून घेतले!
– विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पाऊस
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – विदर्भ व मराठवाड्यात सोसाट्याचा वारा वाहात असून, गारपिटीसह जोरदार पावसाने शेतातील सोंगणीला आलेली उभी पिके आडवी झाल्याने शेतकरी प्रचंड खचून गेला असून, त्यामुळे तो नैराश्यात चालला आहे. उभे पीक आडवे झालेले पाहून गंगापूर तालुक्यातील एका शेतकर्याने तर अक्षरशः तोंड झोडून घेतले. या अवकाळी पावसाने गहू, हरबरा पिके आडवी झाली तर आंबा सध्या काही ठिकाणी फुलोर्याला आहे. पण, जोरदार वार्याने फुलोरा झडला आहे. आंब्याचे बारीक मणीसुद्धा गळाले आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
आधीच पिकांना भाव नाही, त्यातच अवकाळी पावसाने दाणादाण केली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाल्याचे पाहून एका शेतकर्याने तोंड झोडून घेतले. या शेतकर्याने सकाळी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली असता, डोळ्यात पाणी आले. एवढ्या मेहनतीने पिकवले पीक पाण्यात वाहून गेले आहे. आपल्या हाताने तोंडू झोडून काढत शेतकर्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सहा ते नऊ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल. त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू, असे राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
————————