बापाला म्हणाला, ‘कपडे आणताे’; बापाला भरचाैकात साेडून पाेरगा बायकाेसह पळून गेला!
चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – एकीकडे माणुसकी व संवेदनशीलता उरली नसल्याची चर्चा होत असतानाच, सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील पोटच्या मुलांनी वयोवृद्ध बापाला रस्त्यांवर बेवारस रित्या सोडून दिले. थंडीमध्ये उपासीपोटी तडफडत असलेल्या वयोवृध्दाला पाहून पत्रकारांनी मदतीचा हात पुढे करून, पोलिसांच्या मदतीने दिव्या फाऊंडेशन संस्था बुलडाणा यांच्या स्वाधीन केले. हा प्रकार देऊळगावराजा येथे घडला.
सविस्तर असे की, सिंदखेडराजा तालुक्यांतील रहिवासी असलेले उत्तम सखाराम गुंजकर वय ८० वर्ष हे वयोवृध्द आजोबा आपल्या मुलाकडे मुंबई येथे गेले होते. मुलगा व सून यांनी बापाला घरातून बाहेर काढण्यासाठी पती-पत्नी यांनी अक्कल लढवून वयोवृध्द पित्याला मुंबईवरून देऊळगावराजा येथे घेवून आले आणि एका दुकानासमोर बसून सागितले की, आम्ही कपडे घेवून येतो तोपर्यंत येथून जावू नका, असे म्हणून मुलगा व सून तेथून निघून गेले आणि परत आलेच नाही. एकटा वयोवृध्द इसम उपाशीपोटी दुपारपासून थंडीमध्ये हुडहुड करीत आहे हे पाहून मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत यांनी त्या वयोवृद्धास विचारपूस केली असता, त्यांनी सांगीतले की मुलगा व सून हे कपडे घेण्याच्या नावाखाली त्यांनी मला चौंडेश्वरी मंदीर चौकात रस्त्यावर सोडून निघून गेले आहेत. असे सांगितल्यानंतर सुषमा राऊत यांनी त्यांना चहा-पाणी व जेवण दिले आणि लगेच मदत करण्यासाठी अतीश सपाटे, नारायण सपाटे, राजेश सपाटे व इतर नागरिकांना बोलावून घेतले. आता या वयोवृध्द इसमास कोण मदत करेल म्हणून लगेच पत्रकार सुषमा राऊत यांनी मेरा बुद्रूक येथील दैनकि देशोन्नतीचे पत्रकार तथा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रताप मोरे यांच्याशी संपर्क करून हकीकत सांगितली असता, त्यांनी तात्काळ राहेरी येथील केवट यांना फोन करून माहिती दिली.
केवट हे धावत वयोवृध्द इसमाच्या मुलाच्या घरी जावून मुलगा राजू उत्तम गुंजकर यांना सांगीतले. त्या मुलाची वडिल सांभाळ करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने वडिलांना सांभाळू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकाने सोडले रस्त्यांवर बेवारस अन् दुसर्याने झटली सांभाळ करण्याची जबाबदारी. म्हणून त्या वृद्ध निराधारांचे अश्रू पुसण्यासाठी व त्याला आधार देण्यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्याकडे माहिती देण्यात आली. सुषमा राऊत यांनी रितसर पोलीस स्टेशन येथे लेखी माहिती दिली. त्यावरून एपीआय शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट येथील दिव्यसेवा फांऊडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी उत्तम गुंजकर या वयोवृद्धास संरक्षण व संगोपणाकरिता स्वीकरण्याची तयारी दर्शविली. स्थानिक नागरिका समक्ष दिव्या सेवा प्रकल्पचे संचालक अशोक काकडे व इतर स्वयंसेवकाकडे सदभावनापूर्वक सुपुर्द केले. याप्रसंगी पत्रकार चंद्रभान झिने व इतर पत्रकार उपस्थित होते.
भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास घालणे, ही भावना माणसाला आनंदायी बनविते. नेमका हाच आनंद येथील पत्रकारांनी ४ मार्च रोजी अनुभवला. निराधार झालेल्या वयोवृद्ध उत्तम गुंजकरना दिव्यासेवा फाऊंडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्या सपुर्द करुन त्यांची सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. देऊळगावराजा शहराच्या मध्यवस्तीत सोडून स्वतःची मुले निघून गेले. त्या निराधार अवस्थेत असल्याने स्थानिक मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत यांनी त्या वयोवृद्धास विचारपूस केल्यावर मुलगा व सुन यांनी मला सोडून निघून गेले असे सांगितले. परंतु माणुसकी नसल्याने मुलांनी बापाला संभाळणार नाही असे उत्तर दिल्यावर पत्रकारांनी पुढाकर घेत बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट येथील दिव्यासेवा फाऊंडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी त्या वयोवद्धाला दिला मदतीचा हात.