BULDHANAHead linesKhamgaonVidharbha

प्राणी-पक्ष्यांवर उपचारासाठी आता जनुना येथे जिल्ह्यातील पहिले ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’!!

– वन्यजीवांच्या उपचारासाठी आता नागपूर, पुणे जायाची गरज नाही !

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगावसह इतर वनपरिक्षेत्रातील जखमी तसेच आजारी वन्यजीवांना यापुढे उपचारासाठी नागपूर किंवा पुणे येथे नेण्याची गरज भासणार नसून, खामगाव मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड़. आकाश फुंड़कर यांच्या प्रयत्नाने खामगाव मतदारसंघातील जनुना येथे वन्यजीवांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मंजूर झाले असून, त्यासाठी १० कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्यजीवांवर उपचार करणे आणि उपचारानंतर त्यांना जंगलात सोडण्याचे काम केले जाते. या सेंटरमध्ये एक कंट्रोल रूम असते व ती २४ तास निसर्गप्रेमीसाठी सज्ज असते.

खामगाव विधानसभा मतदारसंघात बुलढ़ाणा प्रादेशिक वन्यजीव विभाग खामगाव वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात बिबट, अस्वल, काळवीट, निलगायसह अनेक प्रकारचे संरक्षीत प्राणी व पक्षी राहतात. यामध्ये अनेकदा यातील प्राणी जखमी किंवा आजारी असतात. कधी योग्य व वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावा लागतो. यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड़. आकाश फुंड़कर यांनी खामगाव येथे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाला सादर करण्याबाबत सूचना केली होती. तसा परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलढ़ाणा यांनी ड़िसेंबर २०२२ मध्ये संबंधित विभागास सादर केला होता. त्यानुसार आ. अ‍ॅड़. आकाश फुंड़कर यांनी पाठपुरावा केल्याने सदरचे सेंटर खामगावजवळील जनुना वनपरिक्षेत्र येथे मंजूर झाले असून, त्यासाठी १० कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.

सद्यस्थितीत केवळ नागपूर व पुणे येथेच वन्यजीवांना उपचारासाठी न्यावे लागते. हे अंतर जास्त असल्याने वेळेवर उपचाराअभावी कधी कधी वन्यजीव दगावतात. विशेष म्हणजे, या अभयारण्यात अस्वलांची संख्या मोठी आहे. या सेंटरमुळे ज्ञानगंगासह अंबाबरवा, लोणार अभयारण्यातील वन्यजीवांवर उपचारासाठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे ट्रीटमेंट सेंटर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असून, बुलढाणा जिल्ह्यातील हे पहिलेच ट्रीटमेंट सेंटर ठरणार आहे.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!