बुलढाणा (खास प्रतिनिधी) – आधीच शेतकरी त्रस्त असताना, कष्टाने पिकवलेले पीकदेखील जाळण्याचा प्रकार सुरू आहे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील दोन भावांचा शेतातील ९० हजार रुपये किमतीच्या हरभर्याच्या गंजीला अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. अज्ञात आरोपी विरोधात देऊळगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथील शेतकरी संजय बबनआप्पा निठवे व त्यांचे भाऊ रमेश निठवे यांची गावात शेती आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पिक उभे केले. दोघही भावांना प्रत्येकी ९ क्विंटल हरभरा पिक झाले. त्यांनी नुकतेच हरभरा पिक काढणी करून शेतामध्ये गंजी लावून ठेवली होती. परंतु रात्री अज्ञात आरोपीने गंजी पेटवून दिल्याने या हरभरा पिकाचा कोळसा झाला. दरम्यान, ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. शेतकर्याच्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे.