कर्जत (प्रतिनिधी) – भोसे (ता.कर्जत) येथील बाळूमामाच्या मंदिराचा बोर्ड काढ तसेच कंपाऊंडदेखील काढ असे म्हणत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी सरपंच पती अमोल खराडे यांनी दिल्याचा प्रकार उघड झाला असून, याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि १९ फेब्रुवारी रोजी दुपारच्या १.३० च्या सुमारास महेश दिलीप ढोले हे संत बाळूमामा मंदीर परिसरात झाडांना पाणी देत होते. यावेळी गावातीलच अमोल रोहिदास खराडे हा तेथे आला. त्याने महेश ढोले यांना बाळूमामा मंदिराचा बोर्ड येथून काढून घे. आणि झाडांचे घातलेले कंपाऊंड देखील काढ असे म्हटला. यावेळी ढोले यांना अमोल खराडे याने घाण-घाण शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची रीतसर फिर्याद महेश ढोले यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. वरील गुन्ह्या दाखल केल्याचा राग धरत पुन्हा अमोल खराडे यांने फिर्यादी ढोले यांच्या घराभोवती घिरट्या घालत दि. २० फेब्रुवारीरोजी सकाळी दमदाटी आणि शिवीगाळ केली. याबाबत दि. २० फेब्रुवारीरोजी दुसरी फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्यादीनुसार अमोल रोहिदास खराडे यांच्यावर भादंवि कलम ३२३, ५०४ आणि ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, सदर घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विकास चंदन हे करीत आहे. सदर घटनेतील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.
अमोल खराडे हे सरपंचाचे पती असून त्यांनी दारू पिऊन मारहाण केली असल्याचे सांगितले जाते. तसेच तो गावातील बलाढ्य व धनाढ्य आहे. त्यामुळे त्याची गावात दहशत असून तो आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर ढोले यांनी केला आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.