BULDHANAHead linesVidharbha

तुपकरांच्या आंदोलनातील ‘त्या’ दहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर!

बुलढाणा (जिल्हा/खास प्रतिनिधी) – पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात ११ फेब्रुवारी रोजी आंदोलन झाले होते. या आंदोलनातील शेतकरी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुपकरांसह २५ जणांनी कारागृहात रवानगी झाली होती तर आणखी दहा कार्यकर्त्यांवर अटकेची टांगती तलवार कायम होती, दरम्यान या दहा कार्यकर्त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनातील या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलन चिघळले होते. रविकांत तुपकर यांच्यासह २५ जणांवर विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान या सर्वांचा जामीन मंजूर झाल्याने सहा दिवसानंतर त्यांची अकोला कारागृहातून सुटका झाली. जेलमधून बाहेर येताच रविकांत तुपकरांसह या सर्वांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले.

रविकांत तुपकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली. हजार वेळा तुरुंगात टाकले तरी शेतकर्‍यांसाठीचा लढा सुरुच राहणार असे सांगत, पुढील महिन्यात भव्य यात्रा काढणार असल्याची घोषणा तुपकरांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आधी गुन्हे दाखल केलेल्या रविकांत तुपकरांसह इतर २५ जणांव्यतिरिक्त डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, प्रदीप शेळके, विजय बोराडे, शेख अझर शेख अजाज, राऊफ लाला व भागवत सुसर या दहा कार्यकर्त्यांना आरोपी बनवून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. या दहा जणांनाही अटक केली जाणार होती. त्यामुळे हे कार्यकर्ते भूमिगत होते.

दरम्यान, अ‍ॅड.शर्वरी तुपकर यांनी या दहा कार्यकर्त्यांच्यावतीने अटकपूर्व जामीनअर्ज दाखल करुन न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला. या आरोपींच्या विरोधात विशेष असे स्वतंत्र आरोप केलेले नव्हते, पोलिसांचेही जे आरोप आहेत ते सर्व रविकांत तुपकर यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे या दहा जणांना कस्टडीमध्ये घेऊन चौकशी करण्याची फारशी गरज नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त करत या दहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला असल्याची माहिती अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी दिली आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने या शेतकरी आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


तुपकरांचे आंदोलन शेतकर्‍यांसाठी!

रविकांत तुपकर यांचे आंदोलन हे शेतकरी हिताचे आंदोलन होते. तुपकर हे बर्‍याच काळापासून शेतकर्‍यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यामुळे इतर आरोपींचा तपास करायचा म्हणून त्यांच्या साथीदारांना कस्टडीत ठेवणे गरजेचे नाही, असे मत न्यायालयाने नमुद केल्याने आंदोलकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!