Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

खा. संजय राऊत हा उद्धव ठाकरेंचा ‘भाट’; खासदार प्रतापराव जाधव यांची जोरदार टीका!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन भाटगिरी करण्यासाठी ठेवले आहे, अशी जोरदार टीका शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करण्यात आली होती. यावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार तथा शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन भाटगिरी करण्याकरता ठेवलेला आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. संजय राऊत यांनी आता खासदारांना १०० कोटी दिल्याचा आरोप केल्यानंतर राऊत यांचे गणित कच्च दिसत असल्याचे सांगत, संजय राऊत यांनी आमच्यावर ३०० खोक्यांचा आरोप केला पाहिजे होता. कारण की एक खासदार हा ६ आमदारांचे प्रतिनिधित्व करतो, असे म्हणत संजय राऊत यांची खासदार प्रतापराव जाधव यांनी खिल्ली उडवली. निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे म्हणत होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच आता आरोप केले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावे ते सकाळी खरं बोलत होते का संध्याकाळी खोटे बोलत होते? असा सवाल खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना केला.


एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडलेत, म्हणून त्यांच्यावर आज लाचारीचे दिवस आलेत, असे सांगून खासदार जाधव यांनी सर्वसामान्य शिवसैनिकावरही दावा सांगितला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे असल्यामुळे गावपातळीवरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्या शिवसेनेचेच आहेत. आता त्यांना ठाकरे गटाकडे जायचे असेल तर इकडून तिकडे जावे लागेल, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही ते शिवसेनेचीच असल्याचे सांगत, खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखांवर दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!