बुलढाणा (खास प्रतिनिधी) – गोरगरिबांना स्वप्नातील हक्काचे घर मिळण्यासाठी असणार्या घरकुल योजनांमधील घरकुले लोणार तालुक्यातील बीबी येथे अद्यापही अपूर्ण असून, घरकुलांचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरकुले पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीस्तरावर जनजागृतीसह गावोगावी भेट दिली जात आहे. अपूर्ण राहिलेली घरकुले मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून यंत्रणेला मिळाल्या आहेत. दिलेल्या मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची लाभार्थ्यांवर टांगती तलवार आहे.
लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बीबी येथे प्रधानमंत्री आवास योजना सन २०२१-२२ पर्यंत अपूर्ण असलेले घरकुल ज्यामध्ये प्रथम हप्ता घेतलेले लाभार्थी व वेगवेगळ्या टप्प्यावर अपूर्ण असलेले लाभार्थी यांचे घरकुल बांधकाम २१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करून घ्यावयाचे आहे. जर संबंधित लाभार्थींनी मुद्दतीत अपूर्ण घरकुलाचे बांधकाम पूर्ण नाही केले तर त्यांना देय असलेले उर्वरित अनुदान मिळणार नाही व त्याकरिता संबंधित लाभार्थी जबाबदार राहील, अशा प्रकारच्या लेखी नोटीस लाभार्थ्यांना लोणार पंचायत समितीचे अधिकारी पट्टे व सरपंच चंदाबाई गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल मुळे गजानन इंदोरिया यांनी लाभार्थ्याच्या घरी जाऊन दिल्या.
घरकुल आवास योजना संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे संबंधित लाभार्थी हा ब्लॅकलिस्टमध्ये जाईल, व त्या लाभार्थ्यास शासनाच्या इतर कोणत्याच योजना लाभ मिळणार नाही, आणि संबंधित लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण न केल्यामुळे त्यास मिळालेले अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करून घेण्यात येईल, किंवा संबंधित लाभार्थ्याच्या गाव नमुना आठ आला बोजा चढवण्यात येईल, असे नोटीसद्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अपूर्ण घरकुलांच्या लाभार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.