Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbai

शिवसेना नाव आणि पक्षचिन्हासाठी २००० कोटींची डील!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यासाठी दोन हजार कोटींची डील झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेले आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे तर संजय राऊत यांनी प्रारंभी ट्वीट करून व नंतर पत्रकार परषिद घेऊन खळबळजनक आरोप केला आहे.

बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालावरून राज्यभर संतापाची लाट उसळलेली असून, अख्खा महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हदेखील बहाल केले आहे. यावरुन शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी रविवारी सकाळी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ‘माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बर्‍याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.

राऊत म्हणाले, की ‘मी अत्यंत खात्रीने बोलत आहे आणि लवकरच पुरावे येतील. जो पक्ष शाखाप्रमुख आणि नगरसेवकालाही विकत घेण्यासाठी ५० लाख रुपये देतात. आमदारांना ५० कोटी तर खासदारांना १०० कोटी देत आहेत, तो पक्ष शिवसेना नाव आणि चिन्ह घेण्यासाठी किती मोठा सौदा करुन बसला असेल, याचा हिशोब तुम्हाला जमणार नाही. माझ्याकडे पक्की माहिती आहे. आतापर्यंत शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेतले गेले आहे आणि हा न्याय नाही, हा सौदा आहे. आतापर्यंत यासाठी २००० कोटी खर्च झाले आहेत. ही माहिती त्यांच्या मित्र परिवारातील बांधकाम व्यावसायिकांनी माझ्याकडे दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


मुंबईही विकत घेतील!
पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यात आले आहे. २ हजार कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डरांनीच ही रक्कम दिली आहे. खुद्द या बिल्डरांनीच आम्हाला ही माहिती दिली, असा दावा राऊत यांनी केला. आज पक्ष आणि चिन्ह विकत घेतले. उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील, असा दावाही खा. राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचे ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!