शिवजन्मोत्सव लोकोत्सवच! बुलढाणेकरांच्या डोळ्याची पारणे फिटली!!
बुलढाणा (टीम ब्रेकिंग महाराष्ट्र) – छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेकडो वर्षानंतर आजही तितकाच टवटवीत आहे. लाखो लोक शिवराय या शब्दावर आजही प्रेम करतात. जीवन समृद्ध कसे करावे हे शिवचरित्र शिकविते, हा मूलमंत्र घेण्याचा दिवस म्हणजे शिवजयंती होय, असे प्रतिपादन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांनी केले. तर शिवरायांसारखा महापुरुष जगात होणे नाही. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवरायदेखील आहेत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शिवजन्मोत्सवाच्या भरगच्च कार्यक्रमात केले.
शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. आज मुख्य सोहळा जिजामाता प्रेक्षागार येथे भव्य मंचावर पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. शोन चिंचोले होते. तर मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, ओम सिंग राजपूत, सुरेश देवकर, जयश्री ताई शेळके,वंदनाताई निकम,डॉक्टर अनंत शिरसाट, डॉक्टर विकास बाहेकर, एन एच पठाण, टी डी अंभोरे, प्राध्यापक गोपालसिंग राजपूत, प्राध्यापक शाहिनाताई पठाण, अंजली परांजपे, साहित्यिक सदानंद देशमुख यांच्यासह सर्व माजी अध्यक्ष व विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनीही कार्यक्रमास भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.
सकाळी साडेनऊ वाजता विधिवत शिवपूजन पार पडले. पारंपारिक पद्धतीने हेलगे दाम्पत्य यांनी पाळणा सादर केला. यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. योगा ग्रुप खामगावच्यावतीने शंखनाद करण्यात आला. शिवरायांच्या वेशभूषेतील विशाल शेळके यांचा मान्यवरांनी विशेष सन्मान केला. पुढे बोलताना डॉक्टर शोन चिंचोले म्हणाले, सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड प्रक्रिया पार पडली, ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. ती पेलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. वर्षभर शिवजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. यासाठी घेतल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविकातून समिती सचिव सुनील सपकाळ यांनी बुलढाण्यात होणारी शिवजयंती राज्यास नव्हे तर देशासाठी पथदर्शक असल्याचे सांगून महिलांचा आदर करणे हे धोरण महाराजांनी शिकवले. त्यानुसार आजच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा विशेष सहभाग असल्याचे सांगितले. शस्त्र व शास्त्र या दोन्हीवर देखील सपकाळ यांनी भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले. कुठलाही कार्यक्रम तडीस नेण्यासाठी काही बॅक स्टेज कार्यरत असतात शिवजयंती उत्सवाचा भार रणजीतसिंग राजपूत, राजेश हेलगे,डॉक्टर राजेश्वर उबरांडे, सागर काळवाघे, एडवोकेट जयसिंग राजे देशमुख, मृत्युंजय गायकवाड, प्राध्यापक अनिल रिंढे, पत्रकार गणेश निकम यांनी भूमिका पार पाडली. पत्रकार राजेंद्र काळे यांनी मुख्य कार्यक्रमाच तर पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार संचलन केले. संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा, असा अभूतपूर्व शिवजन्म सोहळा बुलढाण्यात पार पडला.
महिला डॉक्टरांनी स्टेज गाजविले
उच्चशिक्षित डॉक्टर्स मंडळी यंदाच्या शिवजयंतीत हिरीरीने सहभागी झाली. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अस्मिता चिंचोले या ढोल पथक प्रमुख होत्या. या पथकात शहरातील उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी अतिशय सुंदर ढोल वादन केले. तर डॉक्टर आरती जोशी, डॉक्टर दिपाली पाटील, डॉक्टर सौ. वैशाली निकम, डॉक्टर सौ मोरे, डॉक्टर सौ. साबळे, डॉक्टर सौ मेहेत्रे, डॉक्टर सौ. पाटील यांच्यासह इतर डॉक्टर्स महिलांनी सांस्कृतिक स्टेज गाजवून सोडले.
बुलढाण्यात शिवस्मारक लवकरच पूर्ण होईल – आ. संजय गायकवाड
बुलढाणा जिल्हा मुख्यालयी दगडी बांधकाम होत असलेले भव्य शिवस्मारक लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही शिवजयंती कार्यक्रमात बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी दिली. हे शिवस्मारक आगामी काही दिवसात तडीस नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महापुरुषांचे स्मरण व्हावे यासाठी बुलढाण्यात विविध स्मारके उभे करण्याचे काम आमदार गायकवाड यांच्या माध्यमातून होत आहे.
आ. गायकवाड यांच्याकडून ३ लक्ष रुपयाचे शिवदान!
बुलढाणा शहरामध्ये दरवर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये तसेच हजारो शिवशंभू भक्तांच्या साक्षीने निघत असते, अशा परम पवित्र शिवकार्यास ३ लक्ष रुपयांचा शिवनिधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्याकडून देण्यात आला. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, मृत्युंजय संजय गायकवाड, सुनील सपकाळ, रणजीत राजपूत, सुनील जवंजाळ, सागर काळवाघे, निलेश हरकल तसेच असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर बुलढाणा शहरातील जिजाऊ जिजामाता महाविद्यालय येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा तसेच मुलांच्या नूतनिकृत वस्तीगृहाचे आणि नूतनिकृत रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना, जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ,मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, सौ रेखाताई खेडेकर, बाबासाहेब भोंडे, प्रा. जगदेवराव बाहेकर, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेशराव देवकर, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.