BULDHANAVidharbha

टाकळी (वाघजाळ) येथे अग्नितांडव!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मोताळा तालुक्यातील ग्राम टाकळी (वाघजाळ) येथील रामेश्वर शिराळ व राजेंद्र शिराळ यांच्या गुरांच्या गोठ्याला आज, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत गोठ्यामध्ये असलेली एक गाभण म्हैस जळून खाक झाली तर गोठ्यात असलेला चारा, कुटार व शेती उपयोगी साहित्य, टिनपत्रे असा एकूण ६ ते ७ लाखांचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उन्हाळा सुरू झाला असून, आगीच्या घटनांनीदेखील सुरुवात केलेली आहे. आज, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. टाकळी ग्रामस्थ व बुलडाणा अग्निशमन दलांच्या कर्मचार्‍यांनी आगीवर वेळीच नियत्रंण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ग्राम टाकळी येथे गावाच्या प्रवेशदाराजवळ असलेल्या रामेश्वर महादेव शिराळ व राजेंद्र वासुदेव शिराळ यांचा गुरांचा गोठ्याला आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास प्रथम धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर आगीने मोठे रुद्ररुप धारण केल्याने काही वेळातच ४० ते ५० टिनांचा गुराचा गोठा आगीने आपल्या कवेत घेतला.

दरम्यान, टाकळी येथील नागरिकांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात येत नसल्याने शिवसेना नेते गुलाबराव शिराळ यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या सोबत संपर्क करून त्यांच्या मदतीने तात्काळ बुलडाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी व नागरिकांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर २ तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीमध्ये रामेश्वर शिराळ व राजेंद्र शिराळ यांचे एकूण ६ ते ७ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे कर्मचारी तथा बीट अंमलदार हिवाळे तसेच मोताळा तहसीलचे नायब तहसीलदार श्री वाघ व श्री कुरे यांच्यासह मोताळा तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर नुकसानीचा पंचनामा तलाठी व्ही.व्ही. पवार करीत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!