– बुलढाण्यातील पुढार्यांना आणि सरकारला आता सळो की पळो करून सोडणार, छाताडावर पाय देऊन पीकविमा, सोयाबीन, कापसाला भाव घेऊ – तुपकर
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – आम्ही सोयाबीन आणि कापसाला भाव मागितला, पीकविमा मागितला तर या सरकारने आम्हाला दहशतवादी व नक्षलवाद्याला दिली जातात, तशी वागणूक आम्हाला दिली. आम्ही या सरकारला घाबरत नाही. सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत. यापुढे शेतकरीच आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील पुढार्यांना आणि या सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला ठणकावले. तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांची आज दुपारी अकोला कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी तुपकर यांच्या आई तसेच पत्नी यांचीदेखील उपस्थिती होती. कारागृहाबाहेर आई आणि पत्नीने औक्षण करुन रविकांत तुपकर यांचे स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तुपकर यांना खांद्यावर उचलून घेऊन कारागृहाबाहेर जल्लोष केला तसेच, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील पुढारी व राज्य सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतकरी व आमच्यावर लाठीचार्ज केला. नक्षलवादी व दहशतवादी यांना दिली जाते, तशी वागणूक आम्हाला दिली. परंतु, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंह, क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही या सरकारला घाबरणार नाही. या सरकारविरोधात शेतकरी एकजूट झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव मागणार आहोतच, पण यांच्या छाताडावर बसून आता पीकविमा मिळवू, असा इशारादेखील तुपकर यांनी दिला.
आज रविकांत तुपकर आणि त्यांच्या २५ कार्यकर्त्यांची कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी कारागृहासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तुपकरांच्या आई आणि पत्नीने त्यांचे औक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यांना सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ”सरकारने एकतर आम्हांला गाेळ्या घालाव्यात अथवा आत्मदहन करुन द्यावे असा निर्धार करीत आम्ही आंदाेलन छेडले. हे आंदाेलन काेणी चिघळविण्याचा प्रयत्न केला (प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता) हे सर्वज्ञात आहे, असेही तुपकरांनी स्पष्ट केले. शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. दडपशाही, दबावाखाली येणारे आम्ही नाही”, असा इशारादेखील याप्रसंगी रविकांत तुपकरांनी सरकारला दिला.