– ‘खोके गद्दार सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ – घोषणांनी डिग्रस चौक दणाणला!
बुलडाणा (प्रशांत खंडारे) – जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हटल्याने जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे १५ फेब्रुवारीला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा पुतळा फुंकण्यात आला. दरम्यान, तुपकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांना जामीन मंजूर झाल्याने आनंदही व्यक्त करण्यात आला.
सोयाबीन, कापूस या पिकांना भाववाढ व पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी आत्मदहन आंदोलन छेडल्याप्रकरणी अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या २४ साथीदारांना आज न्यायालयात दिलासा मिळाला. बुलढाणा न्यायालयाने तुपकरांसह सर्व आंदोलकांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण तर काही राजकीय व पोलीस प्रशासनाविरोधात संतापदेखील व्यक्त होत आहे. देऊळगांवमहीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला नौटंकी संबोधल्याने या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ डीग्रस चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकर्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘या खोके गद्दार सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय’ ‘शेतकर्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यात आलेच पाहिजे’ अशा घोषणाबाजी करून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असा जयघोष करण्यात आला. त्याचबरोबर राज्य शासनाच्या हुकूमशाही धोरणाचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानीचे सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष मधुकर शिंगणे, जिल्हा सरचिटणीस शेख जुल्फेकार भैया, वसंतराव पाटील, तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे, भरत शिंगणे, अंबादास बुरुकुल, गजानन गुडघे, शिवहरी शिंगणे, गणेश मुजमुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.