बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन, कापूस या पिकांना भाववाढ व पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी आत्मदहन आंदोलन छेडल्याप्रकरणी अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या २४ साथीदारांना आज न्यायालयात दिलासा मिळाला. बुलढाणा न्यायालयाने तुपकरांसह सर्व आंदोलकांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला माहिती दिली. तुपकर व आंदोलकांच्यावतीने त्यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्यानं 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे.
अॅड. शर्वरी तुपकर म्हणाल्या, या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश साने यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली होती. आज न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशामुळे रविकांत तुपकर आणि त्यांच्या समवेत असलेल्या सहकार्यांची आज अकोला कारागृहातून सायंकाळपर्यंत सुटका होईल. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच, रात्री उशिरा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून सर्वांना अटक केली होती. न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलविण्यात आले होते. तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. जोपर्यंत लाठीचार्ज करणार्या अधिकार्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली होती. त्यांनी कारागृहातच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या आंदोलनानंतर पीकविम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुपकरांसह सर्व आंदोलकांना सशर्त जामीन मिळाल्याने, संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनानंतर प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकरांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत, आज देऊळगावमहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला.