Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

रविकांत तुपकरांसह त्यांच्या २५ साथीदारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बुलढाणा (बाळू वानखेडे) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या २५ साथीदारांना आज दुपारनंतर बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता,  न्यायालयाने तुपकरांसह त्यांच्या साथीदारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तुपकरांसह त्यांच्या साथीदारांचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने, उद्या (दि.१३) तुपकरांसह त्यांचे साथीदार जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. आजची रात्र मात्र त्यांची कारागृहातच जाणार आहे. सायंकाळी तुपकरांसह त्यांच्या साथीदारांना अकोला कारागृहात हलविण्यात आले होते.

सोयाबीन, कापूस या पिकांना भाववाढ आणि शेतकरी पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलन केले होते. तुपकरांसह त्यांच्या २५ साथीदारांविरोधात काल मध्यरात्री बुलढाणा पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगलीचे गुन्हे आदी गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर त्यांना अटक करून आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. आज दुपारनंतर त्यांना बुलढाणा पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयातील कोर्ट नंबर चारचे न्यायाधीश वामन जाधव यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले. आरोपींची ओळख परेड झाली. काही आरोपींना मारहाण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी वकिलांच्यावतीने करण्यात आली. पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज त्याचे व्हिडिओ शूट न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत, रविकांत तुपकर व त्यांच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. उद्या रविकांत तुपकर हे जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.


आंदोलनात नसताना आरोपी कसा?
गजानन झांबरे नामक व्यक्ती या आंदोलनात सहभागी नसतानाही त्याला आरोपी बनविण्यात आल्याचा आरोप बचाव पक्षाच्यावतीने न्यायालयापुढे करण्यात आला. सदर व्यक्ती दुसरीकडे दिवसभर असल्याचे पुरावे आहेत. या अनुषंगाने काही महत्वपूर्ण पुरावे सादर करण्यात आलेत. या घटनेत पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा आरोपही करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलिसांची ‘पीसीआर डिमांड’ अमान्य केली व सर्व आरोपींना मेडिकल करून न्यायालयीन काेठडी दिली.


बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात शेतकरी आंदोलन पेटले

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. तुपकर यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दखल केले व अटक केली. या दडपशाहीच्या निषेधार्थ बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात शेतकरी व कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध आंदोलन केले. चिखलीजवळील मेहकर फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीला टायर जाळून निषेध व्यक्त केला. तर सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाशिम जिल्ह्यात काल रात्री संतप्त आंदोलकांनी मालेगांव येथील एसटी बसच्या काचा फोडल्या, तर मानोरा येथील महावितरण कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर काही महामार्गावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!