वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
– महाराष्ट्राची सुटका झाली, शरद पवारांचा खोचक टोला!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून सर्वत्र निंदेस पात्र ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, १३ राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत. कोश्यारी यांच्या उचलबांगडीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून आनंद व्यक्त केला जात असून, नवीन राज्यपालांनी राजभवन हे भाजपचे कार्यालय बनवू नये, असा खोचक सल्ला शिवसेना (ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांनी दिला आहे.
राष्ट्रपती भवनातून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या शिवाय, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेकदा असंतोष धुमसला. थेट युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. केंद्रावरही कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान, कोश्यारी यांनी राजभवनात भाजपचे एजंट म्हणून काम केले. ते काम घटनाबाह्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. तेव्हापासूनच कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने कोश्यारी यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांना पाठिशी घातले, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत टिप्पणी केली. राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला. माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे, यापूर्वीच तो झाला पाहिजे होता. महाराष्ट्राने आजवर अशी व्यक्ती कधी राज्यपाळ झालेली पाहिली नव्हती, ती आपण पाहिली. पण आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्याबाबत बदल केला, ही समाधानाची बाब आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोण आहेत रमेश बैस?
– बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे.
– जुलै २०१९ ते जुलै २०२१ त्रिपुराचे राज्यपाल.
– रायपूरमधून लोकसभेचे सहावेळा खासदार.
– ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००० केंद्रीय रसायन राज्यमंत्री.
– सप्टेंबर २००० ते जानेवारी २००३ केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री.
– जानेवारी २००४ ते मे २००४ केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री.