Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

रविकांत तुपकरांचे आंदोलन चिरडण्यासाठी कोणती ‘जनरल डायरची औलाद’ कामाला लागली?

– शेतकरी उद्रेक चिरडण्याची राज्य सरकारला राजकीय किंमत मोजावीच लागणार!

पुरूषोत्तम सांगळे

मुंबई/बुलढाणा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व विदर्भातील शेतकर्‍यांचे लढवय्ये नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी राजकारणातील ‘जनरल डायर’ची औलाद कामाला लागली आहे. तुपकर यांना काही दिवस जेलमध्ये ठेवले तर पेटवलेले आंदोलन शांत होईल, नंतर यथावकाश ते गुंडाळता येईल. तोपर्यंत पीकविमा व इतर नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली तर शेतकरी उद्रेकही शमविता येईल, अशी काहीशी रणनीती या ‘जनरल डायर’च्या औलादीने आखलेली दिसते!; ‘रविकांत तुपकरांचे आंदोलन तुम्ही तुमच्या पद्धतीने हाताळा’, असे बुलढाणा पोलिसांना कुणी आदेश दिले? रविकांत तुपकर हे बुलढाण्याचे पुढील खासदार आहेत; कदाचित ते नजीकच्या काळात महाविकास आघाडी पुरस्कृत खासदारही राहू शकतात. त्यामुळे उठसुठ राज्य सरकारविरोधात शेतकरी भडकविण्याचा प्रयत्न करणार्‍या तुपकरांचे पंख छाटण्यासाठी कोण पडद्याआडून खेळी करत आहे? काल रात्री उशिरा तुपकर यांच्यासह त्यांच्या तब्बल २५ सहकार्‍यांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अशा स्वरुपाची गंभीर कलमे दाखल करून गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच तुपकरांचे हे आंदोलन राजकीय स्वरुपाचे न राहाता, ते पोलिस व बुलढाणा जिल्हा प्रशासनाविरोधात ठरवून, विशेष करून तुपकर आणि पोलिस यांच्यात संघर्ष लावून कोणता ‘अनाजी पंत’ शेतकरी उद्रेक चिरडू पाहात आहे? याचा शेतकरी व बुलढाणेकरांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

सोयाबीन, कापूस व पीकविमा याप्रश्नी रविकांत तुपकर यांनी आत्मदहनासारखा आत्मघातकी आंदोलनाचा मार्ग चोखळला. यापूर्वीही त्यांनी याप्रश्नी मुंबईतील अरबी समुद्रात आत्महत्या करण्याची धमकी देऊन सनसनाटी निर्माण केली होती. त्यावेळेस काही पत्रकार व राजकीय नेतृत्वाच्या मध्यस्थीने राज्य सरकारने रविकांत तुपकरांशी चर्चा करून ‘मध्यम मार्ग’ काढला होता. आजही कापूस व सोयाबीनचे भाव हे केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विषय असून, त्यासाठी काही ‘घटक’ अडचणी निर्माण करत आहेत. परंतु, केंद्राच्या विरोधात बोलण्याची राज्यातील नेतृत्वाची हिंमत नाही. त्यामुळे सोयाबीन व कापसाच्या भावाचा प्रश्न सुटत नाही. एआयसी पीकविमा कंपनी व शेतकरी यांच्यात पीकविम्यावरून काही तांत्रिक बाबी अडचणीच्या आहेत. राज्य सरकारने ऑनलाईनचा घोळ घातल्याने मदतीचा मुद्दाही गंभीर झालेला आहे. राज्य सरकारने पैसे दिलेत, पण ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जात नाहीत, ते पाहून राज्य सरकारमधील वरिष्ठ नेतृत्वदेखील संतप्त आहेत, व संबंधितांना त्यांनी तातडीने पैसे शेतकर्‍यांपर्यंत गेले पाहिजेत, ही तंबीही दिलेली आहे. परंतु, या तांत्रिक प्रक्रियेला विलंब लागणे, व एआयसी कंपनीची हटवादी व नफेखोर भूमिका, यामुळे प्रत्यक्षात ‘ग्राऊंड’वर शेतकरी उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यातच रविकांत तुपकर यांनी टोकाचे पाऊल उचलत, आत्मघाती अशा आत्मदहन आंदोलनाची भूमिका घेऊन राज्य सरकारला व विशेष करून एकप्रकारे भाजप नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारमधील ‘अणाजी पंत’ खवळले आहेत. तुपकरांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने त्यांच्याशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला. पण, त्यात वरिष्ठ नेतृत्व कुठे दिसून आले नाही. तुपकरांना फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना इशारा दिल्याप्रमाणे आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे तुपकर हे आपसूकच पोलिस कारवाईच्या जाळ्यात अडकले. तुपकरांना नोटीस दिली जाणे, तुपकर ऐकणार नाही, भूमिगत होणार, हे गृहीत धरूनच त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याची भूमिका सरकारमधील ‘अणाजी पंताने’ घेतली असल्याची खात्रीशीर माहिती कानावर आली आहे. आता तुपकरांनी केलेले हे आंदोलन राज्य किंवा केंद्र सरकार यांच्याविरोधात न राहता, ते पोलिस, जिल्हा प्रशासन विरूद्ध तुपकर असे चिघळले आहे. त्यामुळे येथे तुपकर अलगद जाळ्यात अडकले, व राज्यातील ‘अणाजी पंत’ नेता त्याच्या व्यूहरचनेत जिंकला आहे. पुढील काळात तुपकर व त्यांचे सहकारी हे कारागृहात दिसतील, व हे आंदोलन यथावकाश गुंडाळता येईल, ही खेळी यशस्वी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा डोळा आहे. या मतदारसंघात भाजपकडून उमेदवार दिला जाईल. सद्या या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार असला तरी, प्रतापरावांना उद्या ‘कमळ’ हाती घेण्याची वेळ येऊ शकते. तसेच, प्रतापराव जाधव विरुद्ध रविकांत तुपकर अशी लढत अटळ आहे. या मतदारसंघात यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्यासारखा ‘विनिंग एबिलिटी Candidate’ ते निश्चित देतील. या मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ व राहुल बोंद्रे हे दोघेही इच्छुक असले तरी, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतृत्वाची विशेष करून महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची इच्छा पाहाता, तुपकर हेच लोकसभेच्या मैदानात उतरणे निश्चित आहे. त्यामुळे भविष्यात भाजपला ते डोईजड होऊ नये, यासाठीच रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची हवा काढणे, त्यांचे पंख छाटण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग करणे, आदी प्रकार सत्ताधारी पक्षांकडून होत असावेत, असा राजकीय संशय निर्माण झालेला आहे. रविकांत तुपकर यांचे आंदोलन शेतकरीहिताचे असले तरी ते आत्मघातकी ठरत असल्याने यापुढे तुपकर यांनी आपली आंदोलनाची रणनीती बदलणे गरजेचे आहे. वारंवार ‘सुबोध सावजीस्टाईल’ आंदोलन करणे हे राजकीय आत्महत्या करण्यासारखे ठरत असते. तुपकरांनी ही रणनीती बदलली नाही तर आता जसे तुपकरांवर पोलिस सोडले, व हे आंदोलन भरकटविले गेले, तसेच प्रकार वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!