बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांना सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व ताण न घेता सामोरे जाऊन यश मिळवावे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथील जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथील व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने १० फेब्रुवारीला संपन्न झालेल्या ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावरील वेबीनारमध्ये ते बोलत होते.
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा विद्यार्थ्यांवर ताण येतो. तसेच मागच्या दोन वर्षात कोविडच्या परिस्थितीचा मूल्यमापन प्रक्रियेवर परिणाम झाला होता. यावर्षी प्रचलित पद्धतीप्रमाणे दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत करावयाचे नियोजन, अभ्यासाची पद्धती, शारीरिक – मानसिक स्वास्थ्य, परीक्षेच्या संदर्भात विविध पद्धतीने घ्यावयाची काळजी, परीक्षेला आनंददायी पद्धतीने कसे सामोरे जाता येईल?, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या कालावधीत मार्गदर्शनासाठी समुपदेशनाची सुविधा, परीक्षेनंतर उच्च शिक्षणाचे नियोजन इत्यादी विषयांसंदर्भात अरविंद शिंगाडे यांनी एससीईआरटीच्या यूट्यूब चॅनलवरून पीपीटी सादरीकरणासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे वेबीनार राज्यभरातील विविध शाळा – महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक मा.कौस्तुभ दिवेगावकर यांचे मार्गदर्शनात सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, सहाय्यक संचालक तथा उपविभाग प्रमुख डॉ. दीपक माळी, विभागाचे अधिव्याख्याता चंदन कुलकर्णी, राज्य समन्वयक शाम राऊत, यांचे मार्गदर्शनात जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी या वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वेबिनारच्या सुरुवातीला विभागाच्या उपक्रमांविषयी प्रस्ताविकातून डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली. समुपदेशक अरविंद शिंगाडे यांचा परिचय नीता जाधव (समुपदेशक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला) यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राज्य समन्वयक शाम राऊत यांनी केले. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या मालिकेच्या माध्यमातून दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ विविध पाच विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हे पाचही वेबिनार एससीईआरटीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार शिंदे, विभागप्रमुख डॉ. समाधान डुकरे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.