तुपकरांचे आंदोलन म्हणजे नौटंकी – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची टीका
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – कापूस, सोयाबीनला भाव, आणि पीकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावर बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ‘तुपकरांचे हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलने केली. मात्र हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही’, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर असून, एका कार्यक्रमासाठी ते जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा प्रकार घडला. या प्रकारावर राज्यभरातून सरकारवर टीका होत आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘तुपकरांचे हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलने केली. मात्र हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही’, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
——————-