मंत्री गुलाबराव पाटलांसह चार आमदार गुवाहाटीत पोहोचले!
१. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
२. योगेश कदम (शिवसेना, दापोली)
३. मंजुळा गावित (अपक्ष, साक्री)
४. गुलाबराव पाटील (मंत्री शिवसेना, जळगाव)
गुवाहाटी (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील हेदेखील आणखी तीन आमदारांसह आज रात्री उशीरा विशेष विमानाने गुवाहाटी येथे पोहोचून, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले. आज शिंदे यांना मिळालेल्या बंडखोरात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, दापोलीचे शिवसेना आमदार योगेश कदम, साक्रीच्या अपक्ष आमदार तथा शिवसेना समर्थक मंजुळा गावीत यांचा समावेश आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊनच गुवाहाटीला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, तेथे पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शिंदे यांच्या सुरात सूर मिसळवला व राज्यात अभद्र युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले जावे, या विचाराने आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो आहोत. दुसरीकडे, उद्या राष्ट्रवादीत नाराज असलेले कृषीमंत्री दादा भुसे हेदेखील गुवाहाटीत दाखल होत आहेत. गुवाहाटीत पोहोचलेल्या चारही आमदारांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
—
उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान सोडले, ‘मातोश्री’वर पोहोचले
महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्ह करताना राजीनामा देण्याची भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, बंडखोरापैकी कुणीही यावे, आणि मुख्यमंत्रीपद सांभाळावे, असे आवाहनही केले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्यांनी आपला वर्षा हा शासकीय बंगला सोडला. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे यांनीही बंगल्यातून बाहेर पडत मातोश्री गाठले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिकांनी वर्षा बंगल्याबाहेर गर्दी केली होती. तसेच, जोरदार नारेबाजीही केली.