१७ बंडखोर आमदार मुंबईत परत येण्याच्या तयारीत!
– खासदार संजय राऊतांचे आव्हान; म्हणाले, सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणून दाखवा!
– मंत्री गुलाबराव पाटलांसह चार आमदार गुवाहाटीत पोहोचले
– शरद पवार, काँग्रेसकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
– सरकार पडणार नाही, आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवू – संजय राऊत
मुंबई/गुवाहाटी (विशेष राजकीय प्रतिनिधी) : शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, असा सल्ला महाविकास आघाडीचे शिल्पकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे पक्षनिरीक्षक कमलनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर, राजकीय घडामोडींना मुंबई व गुवाहाटीत जोर आला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ३४ शिवसेना आमदारांपैकी १७ आमदारांनी मुंबईत परत येण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचादेखील त्यात समावेश असल्याचे विश्वासनीय सूत्राने सांगितले. दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह तीन आमदार गुवाहाटीत पोहोचले असून, त्यात पाटील यांच्यासह एक शिवसेना तर अन्य दोन अपक्ष आमदार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली असता, त्यात ३० आमदार व एकनाथ शिंदे हे गैरहजर आढळले आहेत. या आमदारांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई केली जाऊ शकते. त्यातच, शरद पवार व काँग्रेसने ठाकरेंना सबुरीचा सल्ला देत, एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, असा सल्ला दिला आहे. मुंबईतील या सर्व घडामोडींवर गुवाहाटीत लपून बसलेले बंडखोर आमदार लक्ष ठेवून आहेत. बडतर्फ झाल्यास पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ किंवा नाही, याची चिंता सतावत असल्याने त्यातील १७ आमदारांनी शिंदे यांच्याशी चर्चा करून, मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे, तशी विश्वासनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस व विरोधकांनी आमच्या सरकारवर अविश्वास आणून दाखवावा, असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवूच, असेही राऊत यांनी ठणकावले.
दाेन अपक्ष, दाेन शिवसेना आमदार शिंदेंना मिळाले!
१. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
२. योगेश कदम (शिवसेना, दापोली)
३. मंजुळा गावित (अपक्ष, साक्री)
४. गुलाबराव पाटील (मंत्री शिवसेना, जळगाव)
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील हेदेखील आणखी तीन आमदारांसह आज रात्री उशीरा विशेष विमानाने गुवाहाटी येथे पोहोचून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले. आज शिंदे यांना मिळालेल्या बंडखोरात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, दापोलीचे शिवसेना आमदार योगेश कदम, साक्रीच्या अपक्ष आमदार तथा शिवसेना समर्थक मंजुळा गावीत यांचा समावेश आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊनच गुवाहाटीला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, तेथे पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शिंदे यांच्या सुरात सूर मिसळवला व राज्यात अभद्र युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले जावे, या विचाराने आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो आहोत. दुसरीकडे, उद्या राष्ट्रवादीत नाराज असलेले कृषीमंत्री दादा भुसे हेदेखील गुवाहाटीत दाखल होत आहेत. गुवाहाटीत पोहोचलेल्या चारही आमदारांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
उद्धव ठाकरेंनी शासकीय बंगला सोडला
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रात्री आपला वर्षा हा शासकीय बंगला सोडला आहे. त्यांच्या सामानाची आवराआवर सुरु होती. ते मातोश्री या आपल्या खासगी निवासस्थानात परतले आहेत. दुसरीकडे, शिवसैनिकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत, बंडखोरांचा निषेध केला.—
फुटीर गटामागे असलेल्या 34 आमदार मधील 4 हे अपक्ष आहेत. त्यात शिवसेनेचे 30 आमदार आहेत. त्यातील एक नितीन देशमुख परतले आहेत. तूर्तास, फुटीर गटाकडे 29 शिवसेना आमदार आहेत. त्यांना स्वतंत्र गट मान्यता मिळण्यासाठी 2/3 म्हणजे 37 शिवसेना आमदार हवेत. अजून 8 शॉर्ट आहेत. 4 जाऊन मिळाले तरी 33 होतात, 4 बाकीच राहतात. अपक्ष कितीही असले, काँग्रेस व राष्ट्रवादीतील कितीही आमदारांनी फ्लोअर टेस्टमध्ये फुटिरांच्या बाजूने मतदान केले तरी प्रश्न मिटत नाही. सध्याच्या तिढ्यावर एकमेव मार्ग म्हणजे फुटीर गटाकडे 2/3 म्हणजे 37 शिवसेनेचे आमदार असणे. ते याक्षणी नाहीत. ते जमेपर्यंत काहीही होऊ शकत नाही. 37 आमदार फुटीर गटात न येता कोणतीही पावले उचलली तर सर्व फुटीर आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. सध्या जो टाईमपास चाललाय तो त्यामुळेच. ज्याक्षणी भाजपाला खात्री होईल की फुटीर गटाकडे 37 आमदार आहेत, त्याक्षणी या सर्व फुटिरांना उचलून मुंबईत आणून राज्यपालांसमोर उभे केले जाईल किंवा फ्लोअर टेस्ट घेतली जाईल. जोपर्यंत फुटीर गटाकडे शिवसेनेचे 37 आमदार होत नाहीत, तोवर डेडलॉक कायम राहील, टाईमपास चालू राहील.
- विक्रांत पाटील, ज्येष्ठ संपादक व पत्रकार