बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव आगाराची खामगाव ते देऊळगाव साकरशा ही सकाळची बसफेरी ९ फेब्रुवारी पासून सुरू झाल्याने विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर झाली आहे.
देऊळगाव साकरशा येथून खामगावकडे २० ते २५ विद्यार्थी आयटीआय, जी. एस. कॉलेजसह विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी जातात. शिवाय, नायगाव देशमुख तसेच याच रोडवरील शिर्ला नेमाने, आंबेटाकळी, अटाळी, विहीगाव व इतर गावातील विद्यार्थीही खामगावला शिकतात. बहुतांश कॉलेज सकाळी भरत असल्याने व सकाळी बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तर काही विद्यार्थी खामगावात खोली करून राहत असल्याने आर्थिक भूर्दड़ सहन करावा लागतो. त्यातच आता परीक्षेचे दिवस असल्याने शाळेत वेळेवर न पोहोचल्याने नियोजन कोलमड़ते.
विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी खामगाव ते देऊळगाव साकरशा बसफेरी सुरू व्हावी, यासाठी विद्यार्थ्यासह ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, शेख अबरार, रामचंद्र चव्हाण, जेष्ठ पत्रकार बाळू वानखडे यांनी खामगाव आगारप्रमुख पवार यांना एक महिन्यापूर्वी निवेदन दिले होते व वेळोवेळी भेटून पाठपुरावा केल्याने सदर बसफेरी सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले. सदर बस देऊळगाव साकरशा येथून सकाळी सात वाजता निघते. बस रवाना होतेवेळी ड़िगांबर अल्हाट, रणजीत देशमुख, संतोष रोतळे, विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते.