BULDHANAMaharashtraVidharbha

शेतकऱ्यांच्या हितासाठी फुड पार्क संकल्पना राबविणार : आमदार संजय गायकवाड

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) –  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातील येळगाव येथे फुड पार्क ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी शेतमाल विकत घेण्यापासून त्यावर प्रक्रिया आणि तो योग्य ठिकाणी पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार असल्याचे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन आज जिजामाता प्रेक्षागार येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे विस्तार संचालक डॉ. धनंजय उंदिरवाडे, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, ओमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड म्हणाले, प्रामुख्याने भाजीपाला पिके हे नाशवंत आहेत. त्यावर योग्य वेळीच प्रक्रिया करावी लागते. अन्यथा शेतकऱ्यांवर ही पिके टाकून देण्याची वेळ येते. त्यामुळे फुड पार्कसारखी संकल्पना शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासोबतच बाजारेपठेत ज्या ठिकाणी उत्तम भाव मिळेल, त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल होत आहे. इस्त्राईलसारख्या देशात प्रगत तंत्रज्ञानाने शेती करण्यात येते. तेथील मार्गदर्शकांना कृषि महोत्सवात बोलाविण्यात यावे. त्यांच्या ज्ञानाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाने सोबत दिली तरी चांगले पिक आल्यानंतरही जागतिक बाजारपेठेच्या परिणामामुळे निश्चित हमी भाव मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतीमध्ये पेरताना जागतिक पातळीवर कोणत्या मालाला भाव मिळेल, याचा अंदाज घेऊन त्याला येत्या काळात पिकांची निवड करावी लागणार आहे. जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गामुळे आपला माल थेट जेएनपीटीपर्यंत पोहोचण्याची सुविधा निर्माण झाली आहे. याठिकाणाहून आपण इतर देशात निर्यात करू शकू. शेतीमधून उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन हा एकमेव पर्याय आहे. येत्या काळात सिंचनाच्या विविध योजना राबविण्यात येणार असून प्रामुख्याने अवर्षण क्षेत्रात याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहे. पाठपुराव्यामुळे विम्यापोटी मिळणारी 9 कोटी 87 लाखाची रक्कम प्राप्त झाली आहे. तसेच येत्या काळात 49 हजार शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न निकाली काढण्यात येईल. यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. तसेच पिक घेण्याच्या पद्धतीत बदल होणे ही चांगली बाब आहे. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास शेतीला चांगले दिवस येतील. कृषि प्रदर्शनातील स्टॉल आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री. मुळे शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेततळे, सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यासोबत मुल्य साखळीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. उंदिरवाडे यांनी कृषि प्रदर्शनातील तंत्रज्ञान, प्रात्यक्षिकांचा लाभ घेऊन उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. श्री. डाबरे यांनी प्रास्ताविकातून प्रदर्शनीविषयी माहिती दिली.

यावेळी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कृषि सहायक रूपाली गायकवाड यांनी लिहिलेल्या तृणधान्याच्या पाककला पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अनिता पवार, प्रल्हाद गवते, बाळकृष्ण पाटील, विठ्ठल दंदाळे या प्रगतशिल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषि महोत्सव 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. दरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. सुभाष टाले शेतावर करावयाचे मृद व जलसंधारण तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रणीता कडू पीएमएफएमई अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग आणि संधी, तर सिताफळ महासंघचे अध्यक्ष श्याम गट्टाणी सिताफळ लागवड आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करतील.

रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेशिम संचालनालयाचे सहायक संचालक महेंद्र ढवळे रेशीम उद्योग व्यवसाय, संधी व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्टचे संदिप शेळके शेतकरी उत्पादक कंपनी यांना निर्यातीतील संधी, तसेच दुपारी चार वाजता संजय वाघ ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी, न्युनतम अंश मर्यादा याबाबत मार्गदर्शन करतील. सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे संत्रा पिक व्यवस्थापन, दुपारी दोन वाजता विषयतज्ज्ञ श्रीमती के. सी. गांगडे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करतील. मंगळवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

सदर कृषी महोत्सव 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृषी उपसंचालक विजय बेतिवार यांनी केले. पहील्याच दिवशी जवळ जवळ चार हजार शेतकर्यानी सहभाग नोंदविल्याचे कृषी विभागाकड़ून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!