Head linesMaharashtraPachhim MaharashtraSangali

जेव्हा जिल्हाधिकारी कचेरी ओस पडते, भेटायचे कुणाला? नागरिक कोड्यात!

सांगली (संकेतराज बने) – सांगलीच्या जिल्हाधिकारी कचेरीत जिल्हाधिकारी रजेवर गेलेत. त्यांच्यापाठोपाठ अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीसुद्धा नाहीत. त्यामुळे संपूर्ण कचेरी ओस पडली असून, कोणी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दिसेनात. आपली कैफियत घेऊन भेटायचे कुणाला? असे कोडे शुक्रवारी सांगलीत आलेल्या जनतेला पडले. आता शनिवार, रविवार सुट्टीनंतर सोमवारी तरी अधिकारी उगवणार का? याची चिंता जनतेला लागली आहे. अधिकार्‍यांनी दांडी मारली की त्यांनी हक्काच्या रजा घेतल्या? एकाच दिवशी सर्व अधिकारी अचानक गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुक्रवारचा दिवस म्हणजे आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन दिवस आणि सोमवारी उशिरा येणारे अधिकारी यामुळे लोक गुरुवार, शुक्रवारी आपली कामे घेऊन जिल्हा प्रशासनाच्या दारात येतात. मात्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी रजेवर असल्याने राजाच नसल्याने जिल्हाधिकारी कचेरीची सगळी प्रजासुद्धा निवांत झालेली दिसून आली. शुक्रवारी दुपारी अप्पर तथा प्रभारी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे, त्यांच्या कार्यालयाबाहेर आजचा दिवस अकरा ते एक जनतेला भेटण्यासाठी राखीव होता. त्या काही कारणाने बाहेर असतील म्हणून नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय गाठले. तिथे त्यांच्या कार्यालयाचे कर्मचारी सोडले तर कोणीही नव्हते. इतके प्रमुख अधिकारी नसतील तर महसूल उपजिल्हाधिकार्‍यांच्या कडे लोकांनी भेटावे अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे. वैशिष्ट्य म्हणजे तेही हजर नव्हते. संपूर्ण कार्यालय फिरून काढले तेव्हा पुरवठा शाखेचे तहसीलदार बारकुल यांच्याकडे संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीचा पदभार असावा, असे वातावरण होते. बारकूल यांना आपल्या खात्यातील लोकांची गर्दी सांभाळण्याचे आधीच टार्गेट असते. त्यात इतर जनतेलही त्यांच्याकडेच भेटण्या शिवाय पर्याय नव्हता.


रिकाम्या खुर्चीचे पत्रकारांना दर्शन
ही बाब पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सहज संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीत फेरफटका मारला. तेव्हा बहुतांश उपजिल्हाधिकारी आणि अनेक तहसीलदार दर्जाचे अधिकारीसुद्धा आपल्या खुर्चीवर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे काम घेऊन आलेल्या लोकांना आल्या पावली माघारी फिरण्याशिवाय पर्याय नव्हता.


मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असूनही…
शासनाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गर्दी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री यांचे कार्यालय प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्या कचेरीचा पदभार असतानासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. या प्रकाराची राज्य शासनाने, सामान्य प्रशासन विभागाने आणि पुणे विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि एकाच वेळी सगळ्या अधिकार्‍यांनी दांड्या मारणे किंवा हक्काच्या रजा घेणे त्याला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!