कर्जत (प्रतिनिधी) – कर्जतचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराजांच्या १८५ व्या संजीवन समाधी सोहळा उत्सवानिमित्त कर्जत येथे होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने झाली. सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ३४ वे वर्ष होते.
या हरिनाम सप्ताहात सकाळी ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन, जागर असे विविध कार्यक्रम पार पडलेत. दिनांक ३१ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहामध्ये दररोज विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने पार पडली. आज भंडार्याचे दिवशी ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांचे काल्याचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी आ. रोहित पवार व आ. प्रा राम शिंदे यांनी काल्याच्या कीर्तनात शेजारी बसून कीर्तन श्रवण केले. समाधी मंदिरात याचवेळी भजन करण्यात येत होते व दुपारी बारा वाजता उपस्थितांनी फुले टाकत जोरदार जयघोष केला. सायंकाळी सात वाजता श्री गोदड महाराजांच्या मंदिरात लापशीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दि. ११-२-२०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून सप्ताहस्थळी बाजारतळ येथे शिपीआमटी चपातीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्वांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भंडार्याच्या दुसरे दिवशी संत श्री गोदड महाराजांची पालखी सायंकाळी निघते व रात्रभर शहरातून फिरून पुन्हा मंदिरात येत असते, दि. ११ फेब्रुवारीरोजी सायंकाळी पालखी निघणार आहे. पालखीपुढे वारकरी दिंडी असते.