सोलापूर ‘झेडपी’ प्रशासनाने पुरस्कारासाठी पत्रकारांची केली थट्टा!
सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पत्रकारांना रोख रकमेचे पुरस्कार देतो, असे सांगून बैठकांचा फार्स केला. पत्रकारांना पुरस्काराची रक्कम ऑनलाईन जमा करायची आहे असे सांगून बँक पासबुक, आधार आणि पॅनकार्डची मागणी करण्यात आली व ऐनवेळी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने पत्रकार नाराज झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार संजयमामा शिंदे यांनी झेडपीच्या सेस फंडात दोन लाखाची तरतूद करून झेडपी बीटवर काम पाहणार्या पत्रकारांसाठी पुरस्कार सुरू केले. त्यांच्या कारकर्दीत पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर कोरोना महामारीमुळे गेले तीन वर्षे पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम झालेला नाही. पदाधिकारी असताना कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर हा कार्यक्रम घ्यावा, असा प्रस्ताव अरुण तोडकर, आनंद तानवडे, सुभाष माने यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी सीईओ दिलीप स्वामी यांनी लवकरच कार्यक्रम घेऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रशासनाने कार्यक्रम घेतलाच नाही. त्यामुळे झेडपी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेऊन सीईओ स्वामी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यावर सीईओ स्वामी यांनी पत्रकार पुरस्कारासाठी आर्थिक तरतूद काय आहे हे मुख्य लेखाधिकारी अजय पवार यांच्याकडून तपासून घेणार आहे, असे सांगितले. त्यानंतर पदाधिकार्यांची मुदत संपली व प्रशासकराज सुरू झाले. त्यावर पुन्हा पत्रकारांनी सीईओ स्वामी यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी पत्रकार वाटपाचे निकष तपासण्याची जबाबदारी प्रशासनचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी चंचल पाटील यांना सांगितले असल्याचे सांगितले.
यात पुन्हा एक वर्ष लोटले. तीन वर्षे कार्यक्रम झाला नाही म्हणून पुन्हा पत्रकारांनी सीईओ स्वामी यांची भेट घेतली. त्यावर स्वामी यांनी पुरस्कार वितरण करण्याची जबाबदारी प्रभारी उपमुख्य कार्यकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यावर दिली व लवकरच कार्यक्रम होईल, असे सांगितले. शेळकंदे यांनी कंत्राटी कर्मचारी व संघटनांच्या पदाधिकार्यांना घेऊन यावर काम सुरू केले. त्यामुळे याला आक्षेप घेण्यात आला. पालकमंत्री व आमदारांना घेऊन कार्यक्रम करावा, अशी सूचना पुढे आली. इतके निमित्त करून हा कार्यक्रम लांबविण्याचा प्रयत्न झाला. त्यावर पुन्हा शुक्रवारी सर्वच पत्रकारांनी सीईओ स्वामी यांची भेट घेतली. स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरीला जात आहेत. तेथून कार्यक्रम पार पाडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एकूणच काय प्रशासनाकडून पत्रकार पुरस्काराची अक्षरश: चेष्टा सुरू असल्याचे ज्येष्ठ पत्रकारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रशासनाला दोष देत काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हेच पत्रकारांना पुरस्कार देण्यात दुजाभाव करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात पत्रकारांमध्ये रंगली आहे. त्यामुळे पत्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी झेडपीच्या पदाधिकार्यांनी सुरू केलेले पुरस्कारावरून आता चांगलेच राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने टाळाटाळ करीत पत्रकारांमध्येच लावून दिल्याची चर्चा आहे. पत्रकारांमध्येच आता उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. सडेतोड लिखाण करणार्या पत्रकारांना डावलून सध्या सोलापूर झेडपी ने उदो उदो करणार्यांना जवळ घेऊन शाल पांघरण्याचा प्रशासनाने घाट घातल्याबद्दल कर्मचार्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारांची लेखणी चांगले कामाचे कौतुक व वाईटावर प्रहार करण्यासाठी चालत असते. पण झेडपी प्रशासनाला डोळ्यात अंजन घालणारी पत्रकारिता नको आहे. तळी उचलणार्यांना निमंत्रणे दिली जात आहेत. पण ज्यांनी झेडपीमध्ये शिस्त आणि वंचितापर्यंत योजना नेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
कंत्राटी कर्मचारी बनले ‘साहेब’!
झेडपीच्या प्रशासनातील काही अधिकार्यांकडून पत्रकारामध्येच राजकारण करून भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे. वास्तविक पाहता एखादा पुरस्कार पत्रकारांना द्यायचे असेल तर पत्रकाराच्या एकापेक्षा अधिक जरी संघटना असल्या तरी त्यांच्याशी विचारविनिमय करणे अभिप्रेत आहे. पण पाणी पुरवठा विभागात असलेले कंत्राटी कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हेच सीईओ दिलीप स्वामी यांचे सल्लागार बनले आहेत. स्वच्छता विभागातील बोगस अभियान आता इतर विभागात दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
————-