अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कर्जतमध्ये शानदार उद्घाटन
– मुलांच्या मनाचे पालन पोषण टिकवायचे असेल तर बालसाहित्याशिवाय पर्याय नाही – संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव
कर्जत (आशीष बोरा) – सध्याच्या काळात मोबाईल कंपनी तुमच्या हातात मोबाईलचे खेळणे तुम्हाला देऊन तुमचे खेळणे करीत आहे. विकासाचे साधन म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर कराल तरच मोबाईल चांगला ठरू शकेल, परंतु करमणूकीसाठी जर मोबाईल जर मोबाईल हाताळत असाल तर मोबाईल तुमची हत्या केल्याशिवाय राहणार नाही. हातातील यंत्रे, रिमोट आणि मोबाईलमुळे नव्या पिढीचा घात होतो आहे. खेळणे म्हणून दिलेली ही साधने आत्मघातकीपणाची ठरत आहेत. माहितीमुळे मुले सजग होऊ शकत नाहीत, त्याकरिता त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित करणे गरजेचे आहे, हेच काम बालसाहित्य संमेलने करत असतात असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेचे ४ थे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार ज्ञानमंडप, कर्जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी ९ वाजता राजन लाखे व मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विद्यमाने कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय मध्ये हे बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन ‘नाळ’ मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राला स्वागताध्यक्ष आमदार रोहितदादा पवार, संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे, कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विलास रासकर, सहकार्यवाहक भरत सुरसे, विनोद वाघ, मीरा शिंदे, कविता मेहंदळे, सीमा चव्हाण, विश्वनाथ भुजबळ, विजय जगताप यांच्यासहित कर्जत शहरातील विविध राजकीय व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थसह कर्जत जामखेड तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी साहित्याची गोडी व प्रगल्भता वाढविणे हा संमेलनाचा उद्देश असून न. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. आजपर्यंत शेगाव, महाबळेश्वर. पुणे येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने पार पडली आहेत. ९ ते ११ फेब्रुवारी कर्जतला हे संमेलन संपन्न होत आहे. विद्येचे धन मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम या संमेलनांमधून होत आहे असे म्हंटले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी संमेलन भरविण्याचा मुख्य उद्देश कथन करताना शालेय काळ हा सर्वांगसुंदर असतो, लहानपणापासूनच गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात, घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांच्याकडून गोष्टींच्या माध्यमातून मुलांवर संस्कार होत असतो. एकलव्याच्या गोष्टींमधून आपल्याला गुरुंचा आदर कसा केला पाहिजे हे लक्षात येते. निश्चय केला तर विजयापासून आपणास कोणीही रोखू शकत नाही. शिक्षण घेताना अडचणी येतील परंतु त्यावर मात करण्याची ताकद विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिकांकडून होत असते. कर्जतच्या मातीत संस्कार आहेत हे अखिल भारतीय महिला कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून कर्जतकरांनी दाखवून दिले आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व शाळेतील मुलांना हे संमेलन अनुभवता यावे हा उद्देश ठेवूनच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याने सर्वांनी संमेलनाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी लिखित स्वरुपातील अध्यक्षीय मनोगत स्वतःच्या कवितांसह संमेलनात मांडले. मुलांच्या शारीरिक पालनपोषणाची आपण काळजी घेतो पण मनाच्या भरण पोषणाकडे आपण लक्ष देत नाही. जन्माला येण्याअगोदर गर्भसंस्कार करतोत, पण जन्मल्यानंतर आपण त्याच बालकाकडे जास्त लक्ष देत नाहीत. बालकांना पाळणाघरात ठेवतो, अशी पाळणाघरे वाढली तर पुढच्या पिढ्यांमध्ये असंख्य वृद्धाश्रमेही वाढू लागतील. म्हणून मुलांच्या मनावरील पालन पोषणाकरिता बालसाहित्याची गरज आहे. मुलांच्या मनाचे पालन पोषण टिकवायचे असेल तर बालसाहित्याशिवाय पर्याय नाही. आजी आजोबांची जागा बालसाहित्य भरू शकते. याप्रसंगी त्यांनी ‘शेतामधी माझी खोप, एकुलती एक लाडाची लेक’ या कविता सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले निबंध स्पर्धा बक्षीस वितरण व साहित्य संमेलन निबंध स्पर्धा बक्षीस वितरण शांताबाई शेळके व्यासपीठावर संपन्न झाले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आभार संमेलनाचे संयोजक व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले. या संपूर्ण ४ थे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संयोजन कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेसह सर्व कोअर कमिटी सदस्यांनी केले आहे. त्यांना जामखेड कर्जत मधील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे.