कलाशिक्षक मजहर सय्यद यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम खडूचित्रे!
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा विद्यालयातील कला शिक्षक मजहर सय्यद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या खडूद्वारे चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा असे मोठ्या अक्षरात लिहून त्याखाली जात-पात, धर्म-वंश, प्रांत, नाते-गोते या सर्व मानवी भावनांना कुरवाळत शिवरायांनी सर्वांना ‘मावळे’ या एकाच जातधर्मात आणले, हा दिलेला संदेश आजच्या काळात खूपच बोलका असून विचार करायला लावणारा आहे. फक्त पांढरा व गुलाबी, भगवा, हिरवा या रंगाचे खडू वापरून काढलेल्या चित्रातील हत्तीवर अंबारीत बसलेले शिवाजीराजे, त्यांच्या भोवतीचे मावळे, पाठीमागच्या इमारती मावळ्यांचे हावभाव, त्यांच्या हातातील तलवारी- भाले, पताका, छत्र चामर आदीसह या सुंदर मिरवणुकीकडे अत्यंत कुतूहलाने पाहणारी महिला हे सर्व फक्त खडूने रेखाटले आहे.
या चित्रांची विशेष चर्चा सद्या सोशल मीडियावर रंगली असून, अभिनेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी हे चित्र आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध करून कला शिक्षक मजहर सय्यद यांचे कौतुक केले आहे. सय्यद सर आपल्या महाविद्यालयात सातत्याने विविध प्रसंगाचे औचित्य साधत खडूने चित्र काढत असतात, व त्यांचे सातत्याने कौतुक केले जाते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या या अद्वितीय चित्रांचे ही विशेष कौतुक होत आहे.