कर्जत नगरपंचायतमधील गैरव्यवहाराबाबत विधानपरिषदेत आ. राम शिंदेंचा तारांकित प्रश्न
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत नगरपंचायतीमधील गैरव्यवहाराची विभागीय चौकशी करण्याबाबत कर्जतमधून दिलेल्या निवेदनाबाबत आ. राम शिंदे यांनी थेट विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला असल्याने आगामी काळात कर्जत नगरपंचायत विशेष गाजणार आहे.
कर्जत (जि. अहमदनगर) नगरपंचायतीमधील गैरकारभारावर आळा घालून गैरव्यवहाराची विभागीय चौकशी करुन दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री यांना दिनांक ७ सप्टेंबर, २०२२ रोजी विठ्ठल वसंत सोनमाळी (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी दिले आहे. यावरूनच विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांनी सन २०२३ च्या अर्थसंकल्पीय – अधिवेशनात विधानपरिषद तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, याबाबत शासनाने चौकशी करुन कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, अद्याप चौकशी झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे.
कर्जत नगर पंचायत गेली काही वर्षापासून अत्यंत चांगल्या कामामुळे मिळालेल्या विविध पुरस्काराने राज्यात गाजत आहे. मात्र या चांगल्या कामातच अनेक गैरव्यवहार झाले की काय अशा शंका या निमित्ताने उपस्थित केल्या जाऊ लागल्या असून, यामुळे पुन्हा कर्जत नगर पंचायत राज्यात गाजते काय याकडे सर्वाचे लक्ष लागणार आहे.