एकात्मिक बालविकास विभागाच्या महिला कर्मचार्यांनी केला पत्रकारांचा सत्कार
चिखली (तालुका प्रतिनिधी) – त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील मेरा बुद्रूक, मेरा खुर्द, अंत्री खेडेकर सर्कलच्या पर्यवेक्षिका केवट मॅडम यांनी अभिनव उपक्रम हाती घेवून, ज्येष्ठ पत्रकारांना अंगणवाडी केंद्र मेरा खुर्द येथे ८ फेब्रुवारीरोजी शाल, पुष्प देऊन सन्मानित केले. या कार्यक्रम प्रसंगी मंचावर सत्कारमूर्ती दै. देशोन्नतीचे पत्रकार तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रताप मोरे, दैनिक भारत संग्रामचे पत्रकार सुनिल अंभोरे, शौर्य स्वाभिमानचे पत्रकार कैलास आंधळे, मेरा-अंत्री सर्कलच्या पर्यवेक्षिका केवट मॅडम, अंगणवाडी सेविका कल्पना गवई, आशा गिरी, अंभोरे मॅडम तथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीला मंचावरील सर्व पत्रकार व महिला कर्मचार्यांनी माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी पर्यवेक्षिका केवट मॅडम यांनी मार्गदर्शन केले की, ग्रामीण भागातील सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, गोरगरीब कामगार तसेच औद्योगिक घडामोडींचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून सर्व जेष्ठ पत्रकारांचे खूप मोठे योगदान असते. बुलडाणा, चिखली शहराच्या पत्रकाराच्या बरोबरीचे काम मेरा, अंत्री खेडेकर सर्कल मध्ये हे तीन पत्रकारांचे आहे.
माता रमाई यांच्या जन्मदिनी सर्व महापुरुषांची जाणीव म्हणून हा सन्मान उपक्रम हाती घेतल्याचे पर्यवेक्षिका केवट मॅडम यांनी सांगितले. तसेच पत्रकार मोरे, सुनिल अंभोरे, कल्पना गवई, आशा गिरी, मीना अंभोरे यांची भाषणे झाली. यावेळी सत्कारार्थींमध्ये दै. देशोन्नती ज्येष्ठ पत्रकार व आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रतापराव मोरे, सुनील अंभोरे, कैलास आंधळे, सुनिता ठाकुर, उषा उदार, सुनिता भोपळे, मिरा खांदे, सुर्वे, ज्योती मोरे, रेखा खेडेकर, भुसारी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मीना अंभोरे यांनी केले, आभार प्रदर्शन आशा गिरी यांनी केले.