– अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांची नोकरदार, व्यापारीवर्गाला मोठा दिलासा
– गरिबांना आणखी एक वर्ष मोफत धान्य, नवीन ५० नवे विमानतळ-हेलिपॅड बनविणार
– ५-जी मोबाईल सेवेला केंद्राचा बूस्टर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळणार
– इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल होणार स्वस्त, सिगरेट, चांदी महागणार
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने, आगामी २०२४च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून अर्थमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नोकरदार, व्यापारी व उद्योजक यांना सर्वात मोठा दिलासा देत सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न अर्थमंत्र्यांनी करमुक्त जाहीर केले. तसेच, बेरोजगार युवकांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० लागू करण्याची घोषणाही केली. या शिवाय, गरिबांना मोफत धान्याची मुदतही त्यांनी आणखी वर्षभराकरिता वाढवली. एकूणच या अर्थसंकल्पातून इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार असून, गरीब, नोकरदार, मध्यम उद्योजक यांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केला आहे.
करोना काळात अर्थचक्र ठप्प आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगारकपात सहन करावी लागली. या कालावधीत सरकारनं खाद्यान्न योजना सुरू केली. त्यामुळे गरिबांना महिन्याला मोफत अन्नधान्य मिळालं. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही सरकारनं ही योजना कायम ठेवली. आता सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. खाद्यन्न योजना पुढील वर्षभर सुरू ठेवण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक पाहता ही घोषणा सरकारसाठी महत्त्वाची असेल. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना दिली.
- काय होणार स्वस्त?
एलएडी टिव्ही स्वस्त होणार
टीव्हीचे सुटे भाग
कॅमेरा लेन्स स्वस्त होणार
मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार
इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार
लिथिअम आयन बॅटरी
परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल स्वस्त होणार - काय महागणार?
विशिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट महागणार
विदेशी किचन चिमण्या महागणार
परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी महागणार
सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार
छत्र्या
एक्स-रे मशीन
हिरे
————–
– बजेट अपडेट –
१. सात लाखापर्यंत आयकर नाही
२. सीनिअर सिटीझन अकाउंट योजनाची मर्यादा आता ४.५ लाखांवरून ९ लाख इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आता जेष्ठ नागरिक या योजनेत ४.५ ऐवजी ९ लाख रुपये जमा करू शकतील तर संयुक्त खात्याची मर्यादा १५ लाख इतकी करण्यात आली आहे.
२. महिला सन्मान बचत पत्र – स्वतंत्र्याच्या अमृतकाळात महिलांसाठी नवी बचत योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दोन वर्षासाठी या योजनांचा लाभ घेता येईल. याचा कालावधी मार्च २०२५ मध्ये पूर्ण होईल. याचा अर्थ असा की, मार्च २०२५ पर्यंत महिला २ लाख रुपयांपर्यंतचे सन्मान पत्र खरेदी करू शकतात. यावर ७.५ टक्के इतके व्याज वर्षाला दिले जाईल. दोन वर्षाच्या काळात गरज लागली तर यातील थोडी रक्कम काढून घेता येईल.
३. हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटी – पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी देशात हरित विकासावर भर दिला जाणार आहे. यासाठी नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी ९ हजार ७०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. आगामी वर्षात यासाठी ३५ हजार कोटींची भांडवली तरतूद करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
४. पॅन कार्ड आता कॉमन ओळखपत्र म्हणून वापरता येणार – सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्या सोबत युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
५. रेल्वेसाठी २.४० लाख कोटी – रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०२३-२४साठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी, देशात १०० नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार
६. पुढील ३ वर्षात ३८ हजार ८०० शिक्षक आणि कर्मचार्यांची भरती होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. केंद्र सरकार ३८ ८०० शिक्षक आणि कर्मचार्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करणार आहेत. या शाळातून साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.
७. मुंबईच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम – मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा झाली आहे. मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम अर्थसंकल्पात झालं आहे – विनायक राऊत, ठाकरे गटाचे खासदार
८. भारतीयांचं वार्षिक उत्रन्न वाढले – देशातील भारतीयांचं वार्षिक सरासरी उत्पन्न आता १ लाख ९७ हजार रुपयांपर्यं वाढल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे.
9. गरीबांना 2024 पर्यत मोफत धान्य देणार. तसेच लाभार्थींच्या खात्यात थेट मदत देण्यात येणार आहे. सर्वांगीन विकासाचं स्वप्न पूर्ण केलं – अर्थमंत्री
टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नव्या कर रचनेनुसार आता ६ स्लॅब असणार आहेत. याची सुरुवात २.५ लाखांपासून सुरु होणार आहे. यापूर्वी या कर प्रणालीत ५ स्लॅब होते. यामध्ये आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नात कोणताही स्लॅब असणार नाही.
असा असेल नवीन टॅक्स स्लॅब
- 0 ते तीन लाख 0 %
- 3 ते 6 लाख 5 %
- 6 ते 9 लाख 10 %
- 9 ते 12 लाख 15 %
- 12 ते 15 लाख 20 %
- 15 लाखांपेक्षा जास्त 30 %
सीतारामण यांच्या घोषणेनुसार, वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ०-३ लाखांपर्यंत कोणताही स्लॅब असणार नाही. त्यानंतर ३-६ लाखांपर्यंत ५ टक्के तर ६-९ लाखांपर्यंत १० टक्के, ९-१२ लाखांपर्यंत १५ टक्के त्यानंतर १२-१५ लाखांसाठी २० टक्के आणि १५ लाखांच्यावर ३० टक्के अशी नवी कर रचना असणार आहे.
सिगारेट महाग तर टीव्ही, मोबाईल स्वस्त
अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा केल्या आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, सिगारेट, परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार आहे. तर टीव्ही, काही मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स, खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल्स स्वस्त होणार आहेत.