शाळेचा रेक्टर बनला हैवान, अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुरा-ढोरासारखं मारलं!
सांगली (संकेतराज बने) – शाळेच्या नावावर हॉटेलमधून चहा आणला या रागातून शहरातील एका बड्या विद्यालयाच्या वसतीगृहातील रेक्टरने अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर बाब लक्षात येताच पालक वसतीगृहात येऊन विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. या दोनही विद्यार्थ्यांवर गावातील एका दवाखान्यात उपचार सुरु आहेत. संबंधित रेक्टरवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली आहे.
सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे जितेंद्र दरीनाथ बजबळे आणि बालाजी दरीनाथ बजबळे हे जुळे भाऊ तासगाव शहरातील एका बड्या विद्यामंदिरात सहावीच्या वर्गात शिकायला आहेत. दोघे भाऊ विद्यामंदीराच्या वसतीगृहात राहतात. रविवारी सकाळी वसतीगृहातील विद्यार्थी बाहेर जाऊन चहा घेऊन आले होते. त्या सर्वांनी वसतीगृहामध्ये चहा घेतला. हे निदर्शनास येताच शिपायाने त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. नंतर वसतीगृहाच्या रेक्टरने प्लंबिंग पाईपने या दोन जुळ्या भावांसह चार विद्यार्थ्यांना अमानुषपणे बदडून काढले. मारहाणीमुळे घाबरलेल्या बालाजी बजबळे या विद्यार्थ्याने एका शिक्षिकेचा मोबाईल घेऊन घरी वडिलांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर त्याचे वडील तासगाव येथील वसतीगृहात येऊन दोन मुलांना घरी घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशारा!
बालाजी बजबळे या विद्यार्थ्यांने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यावेळी वडिलांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारु का असे विचारले होते, परंतु विद्यार्थ्यांने ठाम नकार दिला. तुम्ही शाळेत विचारणा कराल तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळेच वडील तात्काळ येऊन त्यांना घरी घेऊन गेले आहेत.
मुख्याध्यापकाची शाळेतून काढून टाकण्याची धमकी!
अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्यानंतरही संबंधित शाळा प्रशासनाला बाब गांभीर्याने घ्यावी वाटलेले नाही. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून याबाबत कुठे वाच्यता करु नका. नाहीतर माझ्याकडे मुलांनी गैरवर्तन केलेले सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्या आधारे मी दोघांना थेट शाळेतून काढून टाकीन, असा धमकीवजा इशारा दिला आहे.
रेक्टरचे विद्यार्थ्यासमोरच मद्यप्राशन?
मारहाण करणारा रेक्टर नेहमीच त्रास देत असतो. शिवाय, तो विद्यार्थ्यासमोरच दारू पितो, सिगारेट ओढतो, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. शिवाय, घरी कळवले तर मारहाण करतो. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
——————-