Breaking newsHead linesMaharashtraWorld update

”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” असणार महाराष्ट्राचे राज्यगीत!

मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने या गीतास राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अधिकृत असे राज्यगीत नव्हते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फुर्तीदायक व प्रेरणादेणारे तसेच महाराष्ट्राचे शौर्याचे वर्णन करणारे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा याचे गीतकार कविवर्य राजा निळकंठ बढे, संगीतकार श्रीनिवास खळे असून हे गाणं शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. हे राज्यगीत सुमारे १ मिनिट ४१ सेकंद गायिले किंवा पोलीस बँडवरती वाजविले जाईल.

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना असणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-
१) शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे
ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.
२) १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले
जाईल.
3) राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत
यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.
4) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,
खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरीकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक
कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास
मुभा राहील.
5) राज्यगीत सुरु असतांना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान
करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती
यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.
6) राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा
बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.
7) वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बॅडमार्फत वाजविता येईल.
8) राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील
शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.
9) या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त
आस्थापनांस / कार्यालयांस सूचना द्याव्यात.
10) माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून राज्यगीताचा प्रचार / प्रसार करण्यासाठी
विशेष मोहिम आखण्यात यावी. त्यासाठी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच
समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करण्यात यावा.
11) या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेत स्थळावर उपलब्ध राहील.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होती, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याच ठरले. तसेच पुरस्कारच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!