सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला समजपत्र देणार; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी!
सांगली (संकेतराज बने) – जिल्हा संघर्ष समितीने १३ जानेवारी २०२३ रोजी मिरज शहरालगत असलेल्या ओढ्यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता मैलामिश्रित सांडपाणी सोडण्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याचा परिणाम हा पर्यावरणास धोका पोहोचत असून, नागरिकांच्या आरोग्यावरतीही होत आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी संयुक्तिक पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर लवकरच हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, चालक संभाजी जानकर यांच्यासह जिल्हा संघर्ष समितीचे सल्लागार ओंकार वांगीकर, ज्योतीराम माळी, आर्की. रवींद्र चव्हाण, आसिफ मुजावर उपस्थित होते.
जिल्हा संघर्ष समितीच्यावतीने तक्रार प्राप्त झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाकडून अधिकारी- कर्मचारी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. सदरील दोन्ही ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे पाणी काळसर, दूषित, फेसाळ असून याचा वास येत आहे. नमुने संकलित केले आहेत. हे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतील. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याची दिशा ठरेल. आज मी निरीक्षण आढळून आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला एक समजपत्र देवून व पुढील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल.
– नवनाथ अवताडे (उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)