– २० फेब्रुवारीपासून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा
– आंदोलनस्थळी मोटरसायकल लावण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांना बसण्यासाठी जागा नव्हती. बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली!
करोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या वाजवा, असे आवाहन केले होते. थाळ्या वाजवून करोना तर गेला नाही. पण याच थाळ्यांच्या आवाजाने राज्य सरकार व केंद्र सरकारला जाग येईल, असे अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका या शासकीय सेवेपासून वंचित आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलन केले, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही थाळ्या वाजवून आंदोलन करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – विविध मागण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन करीत, केंद्र व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. आमच्या पोटपाणी, मुलाबाळांचे शिक्षण अन् चांगल्या सोयी-सुविधांसाठी रस्त्यांवर उतरणे पसंद केले. फक्त आश्वासनांची खैरात करून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र व राज्य शासनाला जाग आणण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीपासून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने दिला.
अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.३१) कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी-नाद आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने साडेपाच वर्षांपूर्वी मानधन वाढवले. केंद्र सरकारने केलेल्या वाढीला साडेचार वर्षांचा कालावधी लोटला. कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडी सेविकांनी दिवस रात्र कष्ट घेतले. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह, शासकीय अभियान प्रामाणीकपणे राबवण्यात अंगणवाडीताई सर्वांत पुढे आहेत. पण, त्यांच्या कामाची जाणीव दोन्ही सरकारला नाही. फक्त, आश्वासन देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे. वाढत्या महागाईमुळे अंगणवाडी कर्मचार्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ तुटपुंज्या मानधनावर चालणार कसा? आमच्या मुला-बाळांचे शिक्षण होणार कसे? असा प्रश्न उपस्थित करत, आता आमची सहनशक्ती संपली असून, येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्पेâ देण्यात आला. मागणी पूर्ण न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असून, त्यासंदर्भात प्रशासनाला पूर्वकल्पना, निवेदन देण्यासाठी थाळी-नाद आंदोलन केल्याचे, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी-अंगणवाडी सेविकांनी हक्कांसाठी रस्त्यावरून उतरून लढा देण्यासाठी सज्ज रहावे. प्रशासन व पर्यवेक्षकांनी विविध माहिती भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
या आहेत मागण्या
– कालबाह्य मोबाइलद्वारे सदोष पोषण ट्रॅकर अॅपद्वारे माहिती भरण्याची सक्ती रद्द करा.
– स्थानिक भाषेत मोबाईल अॅप उपलब्ध करून द्यावा.
– सेविकांना २० हजार, मदतनीस ना १८ हजार रुपये वेतन द्यावे.
– शासकीय सेवेत सहभागी करून, सर्व सुविधांचा लाभ द्यावा.
भविष्यनिर्वाह भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने द्या.
—————-