अल्पवयीन शिष्येवरील बलात्कारप्रकरणी आसारामबापूला जन्मठेप
गांधीनगर (विशेष प्रतिनिधी) – वादग्रस्त अध्यात्मिक बाबा आसाराम बापू याला गांधीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व लैंगिक शोषणप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २०१३ मधील या गुन्ह्यात आसाराम बापू हा कालच दोषी सिद्ध झाला होता.
सूरत येथे एका अल्पवयीन शिष्येवर आसाराम बापू याने बलात्कार केला होता. त्या प्रकरणात गांधीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी त्याला दोषी ठरवले होते. तर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आसाराम बापूवर ज्या मुलीने बलात्काराचा आरोप केला, ती मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती. या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावले होते आणि १५ ऑगस्ट २०१३ ला तिच्या बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात तो दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार, न्यायालयाने आज त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आसाराम बापू बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जोधपूर येथील तुरुंगात तो सद्या आहे. याआधी जोधपूर बलात्कार प्रकरणामध्ये आसाराम बापूच्यावतीने कोर्टात जामिनासाठी याचिका करण्यात आली होती, पण कोर्टाने ती फेटाळली. आज सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे आसारामचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
——————