Breaking newsBULDHANAHead linesKhandeshWorld update

जळगाव जिल्ह्यात भूकंप, वित्त व जीवितहानी नाही!

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह शहर आणि परिसरात आज सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा माहिती केंद्राच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. भुसावळसह लगतच्या सावदा, कंडारी, रायपूर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. नाशिक वेधशाळेपासून २७८ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली तसे, भीतीचे वातावरण परसले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने अ‍ॅलर्ट जारी करत, नजीकच्या बुलढाणा जिल्हा प्रशासनालाही कळवले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

भुसावळ शहरातील नागरिकांना सकाळी घरांना हादरे बसल्याचे जाणवले. शिवाय काहीतरी वस्तू मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. इमारती हादरत असल्याचे पाहून मोठ्या इमारतीमधील नागरिक लगेचच बाहेर पडले. नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाणवेळ सकाळी १०.३५ वाजता भूकंपाचे हे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे. भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. या भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. आज सकाळी १०.३५ वाजता जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत.


दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले होते. तसेच त्यांना मैदानावर बसवण्यात आले होते. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांकडून पत्रकार परिषद बोलावून माहितीदेखील देण्यात आली होती. जळगावला खेटून बुलढाणा जिल्हा असल्याने जिल्हा प्रशासनाने बुलढाणा जिल्हा प्रशासनालादेखील याबाबत तातडीने माहिती दिली. तसेच, सोशल मीडियावरदेखील मेसेज पाठवून नागरिकांना अ‍ॅलर्ट करत, घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!