सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २३२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे होणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर सरपंच हे अध्यक्ष असून, त्यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. या जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.
राज्यात भाजपची २०१४ मध्ये सत्ता असताना या कामांना गती देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी महाविकास आघाडीची सत्ता असल्याने ही कामे थांबली होती. परंतु आता पुन्हा भाजप सरकार आल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना वेग येणार आहे. राज्यातील ५०० तर सोलापूर जिल्ह्यातील २३२ गावे या जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली आहेत. या योजनेच्या अंतर्गत नाला दुरुस्ती, नाला सरळीकरण, कंपार्टमेंट बिल्डिंग, बंधारे दुरुस्ती, आदी कामे केली जाणार आहेत.
या गावभेटी दौर्यामध्ये सरपंच यांना विश्वासात घेऊन गावातील पाण्याची स्थिती, पडणारा पाऊस, कोणती कामे जलयुक्त मधून झाली आहेत आणि कोणती आणखी करावी लागेल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. विशेषत: त्या गावांमध्ये कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या आराखड्यानुसार कामाला सुरुवात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेचे कामे चांगली झाले होते. आता पुन्हा शासनाने सोलापूर जिल्ह्यातील २३२ गावाचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे गाव भेट दौरा आणि त्यानंतर एप्रिलच्या दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.
– पंडित भोसले, जि. प. जलसंधारण अधिकारी