Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraVidharbhaWorld update

कापसाच्या भाववाढीची आशा फोल; शेतकरी धास्तावले!

– शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर भाव वाढण्याऐवजी आणखी घसरत गेले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयातशुल्क माफ करून तब्बल २० लाख कापूस गाठी आणि सुताची आयात करण्याचा केंद्राच्या धोरणाचा फटका कापूस उत्पादकांना अजूनही बसत असून, कापसाच्या भावात वाढ होण्याची आशा फोल ठरली आहे. सद्या कापसाच्या रूई आणि सरकीचे भाव गडगडलेले असून, त्यामुळे कापूस भावात तेजी येत नसल्याची दुर्देवी परिस्थिती आहे. सरकीचे दर ३८०० रुपयांनी घसरले असून, सद्या कापसाचा सरासरी बाजारभाव ८१०० ते ८२०० प्रतिक्विंटलवर स्थिरावलेला आहे. गेल्यावर्षी हाच बाजारभाव १४ हजारापर्यंत जाऊन पोहोचला होता. उत्पादन खर्च भरमसाठ वाढला; परंतु बाजारभाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे.

सद्या बाजारपेठेत कापसाच्या रुईचे आणि सरकीचे दर घसरलेले आहेत. गेल्या हंगामात कापसाला प्रतिखंडी एक लाख रुपयाचा दर मिळत होता. यंदा मात्र ६१ हजार रुपये प्रतिखंडी असा दर मिळतो आहे. सरकीचे दर ३८०० रुपयेपर्यंत घसरले आहेत. शिवाय, यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये आयातशुल्क माफ करून वीस लाख कापूस गाठीची आणि सुताची आयात देशात झाली आहे. त्याचा फटकाही देशी कापसाच्या बाजारपेठेला अजून बसतो आहे. गेल्या हंगामात कापसाला १४ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. एवढेच नव्हे तर चालू हंगामाच्या सुरुवातीला खान्देशात १४ हजार रुपये प्रतिक्विंटल आणि मराठवाड्यात 11 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. परंतु, तेव्हा शेतकर्‍यांकडे कापूस नव्हता. नंतरच्या काळात कापसाला निदान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळेल, अशी आशा असल्याने शेतकर्‍यांनी कापसाची साठवणूक केली होती. आता दर आणखी घसरले असून, ज्या शेतकर्‍यांनी कापूस साठवला त्यांना पश्चाताप होत आहे.

शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर कापसाचे भाव वाढेल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. मात्र झाले उलटेच, भाव वाढण्याऐवजी घसरत गेले. गेल्या दीड महिन्यांपूर्वी कापसाला नऊ हजार रुपयाचा सरासरी दर मिळू लागला होता. मात्र डिसेंबर महिन्यात दरात मोठी पडझड झाली. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठेत कापसाला अवघा साडेसात हजाराचा दर मिळाला. जानेवारी महिन्यात मात्र परिस्थिती थोडीशी बदलली कापूस दरात थोडी वाढ झाली असली तरी उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नाही. गेल्या आठवड्याभरापासून कापसाला सरासरी ८३०० ते ८५०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. तर सद्या बुलढाण्यासह शेजारील अकोला, यवतमाळ, जालना या भागात सरासरी बाजारभाव ८,१०० ते ८२०० दरम्यान स्थिरावलेला दिसतो आहे.


जानेवारीत कापसाचे भाव वाढतील, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे होते. खास करून १४ जानेवारीनंतर भाववाढ होईल, असे सांगितले जात होते. परंतु, तसे झाले नाही. सद्या कापसाचे भाव साडेआठ हजारांहून कमी आहे. आता मार्चमध्ये तरी भाववाढ होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, मार्चमध्ये भाव वाढले नाही तर मग मात्र शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. देशांतर्गत कापूससाठा वाढला असून, केंद्राच्या आयातशुल्क माफीच्या धोरणाचा कापसाच्या दराला फटका बसला असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!