Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

भावी डॉक्टरांच्या अडचणींचा तिढा काही सुटेना!

सोलापूर (संदीप येरवडे) – सन 2016 साली या विद्यार्थ्यांची पदवी प्रवेश प्रक्रिया नीट परीक्षेद्वारे होणार की सीईटी परीक्षेद्वारे? याबाबत संभ्रमावस्था होती. दोन्ही परीक्षा झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया ही या दोन्हीही प्रवेश परीक्षांद्वारे राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आणि तिथूनच या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय करिअरमधील अडचणींना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची चूक नसतांना पदवी प्रवेशप्रक्रियेसाठी 06 महिने लागले आणि प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची टर्म सहा महिने पुढे ढकलण्यात आल्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी संभ्रमात आहेत. आयुर्वेद शाखेच्या पदवीसाठी (BAMS) 2016-17 साली प्रवेशित झालेली बॅच वैद्यकीय करिअरच्या सुरुवातीपासून ते आज पदव्युत्तर (MD/MS) प्रवेशासाठीही अनेक अडचणींचा सामना करत आहे.

देशातील आयुष (आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) शाखेच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET) 15 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून 33,634 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 31,673 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 9 नोव्हेंबर 2022 रोजी सदर परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. ही परीक्षा पास होण्यासाठी खुल्या वर्गास 50%, तर राखीव वर्गांस 40% गुण पडणे आवश्यक होते. वार्षिक होणाऱ्या या परीक्षेत देशभरातील आयुर्वेद शाखेच्या 413 महाविद्यालयातील एकूण 4584 पदव्युत्तर जागांसाठी जवळपास 13,000 विद्यार्थी पात्र ठरले.
30 डिसेंबर 2022 रोजी पासून या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर प्रवेशासाठी देश (All India Quota) आणि राज्यस्तरावर (State Quota) प्रवेशप्रक्रिया सध्या राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेद शाखेच्या याच 2016-17 बॅचची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकची अंतिम वर्ष परीक्षा कोविड पँडेमिकमुळे 4 महिने उशिरा घेण्यात आली. अशा तऱ्हेने या बॅचने एकूण 5½ वर्षात पूर्ण होणारी पदविका जवळपास 6¼ वर्षात पूर्ण केली, ते ही या विद्यार्थ्यांची कसलीही चूक नसतांना. दरवर्षी आंतरवासियता प्रशिक्षणानंतर कालांतराने घेण्यात येणारी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा यावर्षी (टर्म पुढे गेल्यामुळे) आंतरवासियता प्रशिक्षणादरम्यानच आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. तरीही अधिकचे श्रम घेऊन विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र झाले आहे. आयुर्वेद शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची महाविद्यालयांची पात्रता भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग (NCISM) ठरवते. या आयोगाने यावर्षी महाराष्ट्र राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा, हॉस्पिटल कर्मचारी, रुग्ण खाटा, पशुगृहे इ. चा अभाव, ही कारणे देऊन पदव्युत्तर पदवीच्या 264 जागा भरण्यास बंदी घातली होती. ती उठवून प्रवेशासाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही प्राध्यापक आणि पदव्युत्तर मार्गदर्शकांचा अभाव असल्याने पदव्युत्तर पदवीच्या 89 जागा कमी करण्यात आल्या आहे आणि या मोठ्या अडचणीस आयुर्वेद शाखेच्या त्याच 2016 बॅचच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू, गरजू विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा अन्याय होत आहे. एकीकडे प्राध्यापकांचा अभाव, तर दुसरीकडे विभागीय पदोन्नती आणि कायमस्वरूपी पदभरतीमध्ये शासनाची उदासीनता, यामुळे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत सापडले आहे.

महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशाची जाहीर करण्यात आलेली पहिली यादीही दुसर्‍याच दिवशी रद्द करण्यात आली, कारण अद्ययावत माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील या बंदी असलेल्या 89 जागांमध्ये अजून वाढ होणार आहे.  राज्याचे मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आदींनी या प्रकरणात लक्ष घालून पदव्युत्तर प्रवेशाच्या अधिकाधिक जागा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची चूक नसतांनाही या भावी डॉक्टरांच्या शैक्षणिक अडचणींचा तिढा कधी सुटेल? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.


2016 साली महाराष्ट्र राज्यात पदवीसाठी प्रवेश घेतल्यापासून ते आता पदव्युत्तर प्रवेशापर्यंतही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांची कसलीही चूक नाही. याद्वारे महत्त्वकांक्षी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आहे.

डॉ. ऋषभ मंडलेचा (सोलापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!