सर्वसामान्यांची एसटी संकटात : अनेक गाड्या खराब; गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल!
– चार वाजेनंतर नगर, जामखेड, श्रीगोंदा, बारामतीकडून येण्या-जाण्यासाठी गाड्याच नाहीत!
कर्जत (आशीष बोरा) – सर्वसामान्य व्यक्तीचा आधार असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी ही कोरोनानंतर मोठ्या संकटात सापडली असून, अनेक गाड्या खराब झालेल्या आहेत. यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याने यांचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसलेला असून, एसटीच्या सेवेकडे लोकप्रतिनिधींनी व महामंडळाच्या अधिकार्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
कर्जत तालुका सध्या दोन आमदारांच्या श्रेयवादात अडकला असून, एखाद्या प्रश्नावर दोन्ही बाजून श्रेयासाठी धडपड सुरू आहे. आम्हीच हे काम कसे केले हे मांडण्यात चाढाओढ लागलेली असताना जनतेच्या गरजेच्या अनेक प्रश्नाकडे मात्र या लोकप्रतिनिधीचे अथवा त्याच्या कार्यकर्त्यांचे लक्षच नसल्याचे पहावयास मिळत असल्यामुळे जनतेचे मात्र हाल होत आहेत. या प्रश्नाकडे कोणाचे लक्ष जाते व कोण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कर्जत हे तालुक्याचे ठिकाण येथील एसटी डेपोचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून भिजत घोंगडे पडलेला आहे. आ. राम शिंदेच्या कार्यकाळात एसटी डेपो आणतोच ही घोषणा खूपच गाजली. मात्र त्यांना यात यश मात्र आले नाही, व या घोषणेचा काही प्रमाणात आ. शिंदेंना बसलाच. त्यानंतर गेली अडीच वर्षात आ. रोहित पवार यांना ही एसटी डेपो करण्यात यश मिळाले असा खात्रीशीर दावा करता येणार नाही. आ. राम शिंदे यांच्या कार्यकाळात काही कोटी खर्च करून बांधलेल्या नवीन बसस्थानक इमारतीच्या मागे सध्या बांधकाम सुरू आहे व ते एसटी डेपोचे असल्याचा दावा आ. पवार यांच्यावतीने केला जात आहे. मात्र ते बांधकाम एस टी डेपोचे आहे की व्यापारी गाळ्याचे हे मात्र अद्याप खात्रीशीर समजू शकलेले नाही. त्यामुळे एस टी डेपोचा प्रश्न भिजत पडलेला आहे. जर आ. रोहित पवार यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात एस टी डेपो मंजूर केला असेल तर ते काम प्रा. राम शिंदेना का जमले नाही, असा प्रश्न उभा राहणार असून महामंडळात काम करणारे तेच अधिकारी असताना असे घडू शकते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.
कर्जत तालुक्यात एसटी डेपो नसल्यामुळे तालुक्याच्या परिवहन व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण होत असून, अनेक गावांना एसटीच सध्या जात नाही तर शेजारील जामखेड व श्रीगोंदा डेपोच्या भरवशावर असलेल्या कर्जत तालुक्यातील एसटीच्या अनेक फेर्या अचानक रद्द केल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कर्जतमध्ये येण्यासाठी व कर्जत मधून बाहेर जाण्यासाठी सायंकाळी चार वाजले पासूनच गाड्या नसल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. जामखेडमधून दुपारी साडेचार नंतर कर्जतमध्ये येण्यासाठी गाडी नाही तर नगरमधून पाच नंतर गाडी नाही. त्यामुळे दूरवरून येणार्या प्रवासी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बाहेरून येणार्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द झाल्या आहेत. यामध्ये बारामती डेपोच्या अनेक गाड्या बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे कोणीही गांभीर्याने पाहण्यास तयार नाही, ही कर्जत तालुक्यातील नागरिकांची शोकांतिका आहे. यापूर्वी कर्जत तालुक्यातून प्रवासासाठी असलेल्या अनेक गाड्या गेले काही दिवसापासून बंद असल्याने नागरिकांच्या होणार्या अडचणी बाबत लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जतमध्ये एसटी डेपो नसल्यामुळे तालुक्यातील एसटी प्रवासी वाहतुकीसाठी शेजारच्या तालुक्यावरच अवलंबून राहावे लागत असून, जामखेड व श्रीगोंदा डेपोतील अनेक गाड्या वेळेवर सुटतच नाहीत, तर अनेक गाड्या खराब झालेल्या आहेत. यामुळे त्या अनेकदा बंद पडून नागरिकांना रस्त्यातच ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागात प्रवासासाठी एसटी सर्वात महत्त्वाची असल्याने या सेवेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. एसटी महामंडळाच्या सेवेत कोणते लोकप्रतिधीं कोणता पक्ष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावतात व जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करून खरे श्रेय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.