सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे, विकासकामांची अडवणूक करीत जर लोकप्रतिनिधी जनतेला वेठीस धरण्याचे पाप करीत असतील तर त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद जनतेने ठेवलीच पाहिजे, आज आपण सत्तेत नाही, आपल्या हातात काही नाही तरीदेखील विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची भूक कायम आहे. सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य लोकांच्या कामांना आपण प्रामाणिकपणे प्राधान्य देतो, असे मत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर ) येथील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभापती नळपती बनसोडे, माजी सरपंच महेश पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, दगडू राठोड, राजू पाटील, सज्जन पाटील, गणेश काकडे, नितीन बनसोडे, लक्ष्मण गाडेकर, महादेव म्हमाणे, लक्ष्मण केत, ब्रह्मदेव लेंगरे, महादेव मळगे, महादेव सवळे, अरुण हरनाळकर, प्रभाकर बिराजदार, शिवाजी राठोड, अजय पाटील, राजू फंड, अंकुश पाटील, राहुल बनसोडे, अमृता बनसोडे, किसन नागटिळक, अरुण पाटील, देवकुमार बनसोडे, पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील, गुलाब शेख, हबीब शेख, गणेश फंड, ब्रह्मनाथ पाटील, पांडूरंग हरनाळकर, लक्ष्मण हरनाळकर, सिद्राम बिराजदार, माऊली होनमाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश हसापुरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याचा विकास केवळ सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच होऊ शकला. आज सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम होताना चे एक सुखद चित्र पाहावयास मिळते, शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी खूप काही केले; अनेक मोठे प्रकल्प आणून जिल्ह्याचे नाव देशभरात पोहचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केलेल्या कामाचे श्रेय किंवा प्रसिद्धी त्यांनी घेतली नाही, हेच त्यांचे वेगळेपण आहे.
चेतन नरोटे म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तेत असताना सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक मोठे प्रकल्प मंजूर केले. भाजप सत्तेत आल्यानंतर त्या कामांचे उद्घाटन होत आहेत, आज आपण निवडून आलेले खासदार गप्प आहेत. त्यांनी जात चोरण्याचा मोठा गुन्हा केला, त्यांच्यावर ४२० सारखा गुन्हा आहे. भाजपाच्या अमिषांना बळी न पडता योग्य लोकप्रतिनिधी आपण निवडून देण्याची गरज आहे.