कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने एका आरोपीस नुकतीच मरेपर्यंत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.श्रीगोंदा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मुजीब शेख यांनी एका वर्षातच हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे फिर्यादीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर दोन महिन्यानंतर अत्याचाराबाबत तक्रार केली होती.त्यानंतर वर्षातच संबंधित निर्भयाला न्याय मिळाला आहे या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक यादव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा.चिंचोली काळदात) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून या आरोपीने निर्भया घरी एकटी असताना तिचे तोंड दाबत तिला घरात ओढत नेऊन ‘गप्प बस नाहीतर तोंड दाबून मारीन’ अशी धमकी दिली होती.ती घाबरल्याचा फायदा घेत तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर ‘याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आई बापाला ठार करेन’ अशी धमकीही दिली होती. त्यानंतर दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास उर्फ बबन आखाडे (रा.चिंचोली काळदात) याने फिर्यादीस घडलेल्या प्रकाराबाबत ‘आपण आपसात मिटवून घेऊ अन्यथा तुम्ही जर तक्रार दिली तर आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटीची तक्रार देऊ’ अशी धमकी दिली होती. या भीतीपोटी संबंधित फिर्यादीने तक्रार दाखल केली नव्हती. शहरातील एका कार्यक्रमात पोलीस निरीक्षक यादव यांनी ‘कुणावर अन्याय झाला किंवा कुणी महिला व मुलींना त्रास दिल्यास आपणास थेट कळवा असे आवाहन केले होते त्यानंतर घटनेच्या दोन महिन्यांनी संबंधित महिला फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अखेर वर्षभरात निर्भयाला न्याय मिळाल्याने कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे.
दरम्यान आज रोजी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे भेट दिली होती. कर्जत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस जवान महादेव कोहक, शाम जाधव, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, राणी व्यवहारे, सचिन वारे, ईश्वर माने, बळीराम काकडे, शकील बेग यांचा वरील गुन्ह्यासाठी तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याची उकल करणे, आरोपी अटक करने, मुद्देमाल जप्त करणे अशा उल्लेखनीय
कामगिरी साठी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.