Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPolitics

ठाकरे सरकारचे संकट टळणार, बंड थंड होणार!

मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक हे एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना भेटले, चर्चा
– जळगाव जामोदचे भाजप आ. संजय कुटेंनी घेतली शिंदेंची भेट, शिष्टाई निष्फळ

सुरत (विशेष प्रतिनिधी) – क्रॉस व्होटिंगचा गैरफायदा घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे षडयंत्र जवळपास उधळले गेले आहे. शिवसेना नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, आमदार रविंद्र फाटक यांनी तातडीने सुरत गाठत, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुरत येथील ली मॅरिडन हॉटेलमध्ये घेतली. यावेळी शिंदे यांच्यासह काही आमदारांनी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कोणतेही बंड होणार नाही, आम्ही पक्षासोबत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. तर काही आमदारांनी आम्हाला बळजबरी येथे आणले गेले, असे सांगितले.

सुरत येथे गेलेल्या महाराष्ट्र सरकारच्या विशेष शिष्टमंडळाला प्रारंभी हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, या शिष्टमंडळाने आपण महाराष्ट्र सरकारचे विशेष दूत असल्याचे सांगतल्यानंतर मात्र हॉटेल प्रशासन नरमले व त्यांना आत जाऊ दिले. सोबत असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकानेही हॉटेल व्यस्थापनाला अकोल्यात दाखल तक्रारीची माहिती देत, झडती घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे आत पोहोचलेले या शिष्टमंडळातील नार्वेकर व फाटक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांशी चर्चा केली. तसेच, त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणे करून दिले. त्यावेळी भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच नाही, असे या नेत्यांनी ठाकरे यांना सांगितले. नार्वेकर हे सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येत आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या बैठकीला हे सर्व आमदार हजेरी लावतील. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास शिवसेना नेतृत्व तयार झाले असून, त्याबाबतचा राजकीय पेच सोडविण्याची ग्वाही त्यांना देण्यात आली आहे. ही घडामोड सुरतमध्ये होत असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पटेल, कमलनाथ हेदेखील मुंबईकडे निघाले होते. मुंबईत पोहोचल्यानंतर पवार व पटेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या सर्व घडामोडींत ज्यांचा हात असल्याचा संशय आहे, ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील मात्र हाती आला नाही.

संजय कुटे यांनीही घेतली शिंदे यांची भेट
जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दुपारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा निरोप कळवला. या भेटीचा तपशील हाती आला नसला तरी, देवेंद्र फडणवीस हेदेखील सुरतमध्ये येणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. फडणवीस-शिंदे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार होते. परंतु, मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनंतर सर्व आमदारांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले. दुसरीकडे, सूत्राने सांगितले, की एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना विशेष विमानाद्वारे दिल्लीत घेऊन जाण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यासाठीच डॉ. संजय कुटे यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे. परंतु, नार्वेकर व रविंद फाटक यांनी बंडखोर आमदारांचा ताबा घेतला असून, विशेष पथके मुंबईत तैनात ठेवली आहेत. भाजपने काहीही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराथी लोकसंख्या असून, त्यादृष्टीने सायंकाळी शिवसेना भवनासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!